जर्मनीत राहणाऱ्या मुस्कान या पाकिस्तानी ट्रॅव्हल व्लॉगरने एक मोठा खुलासा केला आहे. जर्मन पासपोर्ट मिळताच ती सर्वात आधी भारताला भेट देणार असल्याचं तिने सांगितलं आहे.

जर्मनीत राहणाऱ्या एका पाकिस्तानी ट्रॅव्हल व्लॉगरने सध्या भारतीय युजर्सची मनं जिंकली आहेत. तिने नुकतीच आपल्या एका मोठ्या स्वप्नाबद्दल माहिती दिली. @muskaan.travels या नावाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करणारी मुस्कान आतापर्यंत २० हून अधिक देशांमध्ये फिरली आहे. पण भारत अजूनही तिच्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे.

यामागे एक खास कारण आहे. एका इन्स्टाग्राम रीलमध्ये ती म्हणाली की, जर्मन पासपोर्ट हातात पडताच ती पहिल्यांदा भारतात येईल. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तिने स्पष्टच सांगितलं की, ती पाकिस्तानी असली तरी तिचं मन दिल्लीत अडकलं आहे.

तिची भारतात यायची इच्छा काही आजची नाहीये. लहानपणापासून बॉलिवूड सिनेमे बघतानाच तिने या जागा डोक्यात पक्क्या करून ठेवल्या होत्या.

तिने आपल्या व्हिडीओमध्ये भारतात आल्यावर काय काय करायचंय, याची पूर्ण लिस्टच सांगितली आहे. तिला फक्त प्रसिद्ध ठिकाणी फोटो काढायचे नाहीत, तर इथली संस्कृती, अध्यात्म आणि सण जवळून अनुभवायचे आहेत.

तिच्या यादीत भारतातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणांचा समावेश आहे.

आग्रा येथील ताजमहालला सूर्योदयाच्या वेळी भेट देणं हे तिचं सर्वात मोठं स्वप्न आहे. पहाटेच्या प्रकाशात ते पांढरं संगमरवर जवळून बघायची तिची खूप दिवसांची इच्छा आहे.

दिल्लीचं लोटस टेम्पल तिच्यासाठी खूप खास आहे. बहाई धर्माची अनुयायी असल्यामुळे, तिला तिथे काही काळ शांततेत घालवायचा आहे. तिच्या मते, हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून तिचं वैयक्तिक स्वप्न आहे.

वाराणसीतील गंगेची संध्याकाळची आरतीही तिला अनुभवायची आहे. शक्यतो बोटीत बसून दिव्यांचा प्रकाश, मंत्रोच्चार आणि घाटावरील मंदिरांच्या घंटांचा आवाज तिला ऐकायचा आहे.

View post on Instagram
 

ऋषिकेशमधील योगा रिट्रीट, ध्यान आणि गंगेकाठचं शांत वातावरण हेदेखील तिच्या यादीत आहे. तिला तिथे जाऊन खरी शांतता अनुभवायची आहे.

होळीचा सणसुद्धा तिच्या लिस्टमध्ये आहे. तिला फक्त स्क्रीनवर होळी न पाहता, रंग, संगीत आणि त्या गोंधळात प्रत्यक्ष सामील व्हायचं आहे.

तिचा हा प्लॅन ईशान्येकडील नागालँडच्या हॉर्नबिल फेस्टिव्हलपर्यंत जातो. तिथे तिला आदिवासी संस्कृती, संगीत, नृत्य आणि खाद्यपदार्थ अनुभवायचे आहेत, जे अनेक परदेशी पर्यटक सोडून देतात.

मेघालयातील जिवंत मुळांचे पूल तिला खूप आवडतात. रबर फिग झाडांची मुळं नदीच्या पलीकडे वळवून दशकांपासून तयार केलेले हे पूल बघण्याची तिची खूप इच्छा आहे.

तसंच, जैसलमेरजवळील थर वाळवंटात रात्री मोकळ्या आकाशाखाली कॅम्पिंग करण्याचं तिचं स्वप्न आहे.