जगभरात ३६ तासांहून अधिक काळ चाललेला मायक्रोसॉफ्टचा तांत्रिक बिघाड अखेर दूर झाला आहे. Outlook आणि Microsoft Teams सह Microsoft 365 च्या सर्व सेवा आता पूर्ववत झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

मुंबई : जगभरात ३६ तासांहून अधिक काळ चाललेला मायक्रोसॉफ्टचा तांत्रिक बिघाड अखेर दूर झाला आहे. Outlook आणि Microsoft Teams सह Microsoft 365 च्या सर्व सेवा आता पूर्ववत झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या बिघाडामुळे अनेक युजर्सना ईमेल पाठवताना आणि ऑनलाइन काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. गुरुवारी या बिघाडाला सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेक युजर्सना त्यांच्या ईमेल अकाउंटवर लॉगिन करता येत नव्हते. ईमेल पाठवणे आणि मिळवणे याशिवाय ऑनलाइन मीटिंग्ज, कॅलेंडर मॅनेजमेंट आणि ऑफिसच्या इतर अनेक डिजिटल कामांमध्येही अडचणी येत होत्या. युजर्सनी 'Exchange Online' मेलबॉक्स वापरताना येत असलेल्या अडचणींची तक्रार करण्यास सुरुवात केली. लवकरच ही समस्या Outlook, Teams, Copilot, SharePoint, Planner, To Do आणि कामाशी संबंधित इतर Microsoft 365 सेवांमध्ये पसरली.

Microsoft ची सेवा का बंद पडली होती?

मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे की, या समस्येमागे एक तांत्रिक त्रुटी होती. पूर्वीच्या एका नेटवर्क कॅपॅसिटी अपग्रेडच्या वेळी ही त्रुटी निर्माण झाली होती. नंतर नेटवर्कमध्ये केलेल्या नवीन बदलांमुळे ती उघडकीस आली. या घटनेचा कोणत्याही सायबर हल्ल्याशी किंवा AI-आधारित घडामोडींशी संबंध नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. समस्येचे मूळ कारण शोधून ती सोडवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

७४ देश आणि प्रदेशांमध्ये परिणाम

या बिघाडाचा परिणाम जगातील ७४ देश आणि प्रदेशांमध्ये झाला. Downdetector च्या आकडेवारीनुसार, जगभरातून ७४ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. काही वेळा तर एका मिनिटात सुमारे २० हजार तक्रारी येत होत्या. केवळ वैयक्तिक युजर्सच नाही, तर विविध कंपन्या, सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य सेवांच्या कामातही अडथळे आले. भारतीय विमान कंपन्या IndiGo आणि Akasa Air च्या ईमेल ग्राहक सेवांवरही याचा परिणाम झाल्याचे वृत्त आहे.

मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, Outlook, Teams आणि Copilot युजर्सना आता कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. तरीही, कंपनी त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि ईमेलच्या प्रलंबित कामांवर लक्ष ठेवून आहे. तसेच, या बिघाडाबद्दल कंपनीने माफी मागितली असून, भविष्यात अशी घटना का घडली, याची सविस्तर माहिती देणारा अहवाल प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले आहे.