Kumamoto Masters 2026: भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन (Lakshya Sen) जपानमध्ये (Japan) कुमामोटो मास्टर्सच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. बीडब्ल्यूएफ टूरमध्ये (BWF Tour) सलग दोन टूर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारण्याची कामगिरी त्याने केली आहे.
BWF Tour Final: भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन (Lakshya Sen) सलग दुसऱ्या बीडब्ल्यूएफ टूर फायनलमध्ये पोहोचला आहे. शनिवारी जपानच्या (Japan) कुमामोटो मास्टर्स २०२६ बॅडमिंटन स्पर्धेत (Kumamoto Masters 2026) पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याने उत्कृष्ट कामगिरी करत फायनलचे तिकीट मिळवले. जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या (Indonesia) अलवी फरहानला (Alwi Farhan) हरवून लक्ष्य जेतेपदाच्या आणखी जवळ पोहोचला आहे. ७० मिनिटे चाललेल्या या लढतीत आठव्या मानांकित लक्ष्यने सहाव्या मानांकित फरहानचा २१-१२, १५-२१, २१-११ असा पराभव केला. यापूर्वी दोन वेळा हे दोन्ही खेळाडू आमनेसामने आले होते आणि दोन्ही वेळा भारतीय शटलरला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यावेळी त्याने इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिला विजय नोंदवला.
आक्रमक खेळ करत लक्ष्यचा विजय
मॅचच्या सुरुवातीपासूनच लक्ष्य आक्रमक मूडमध्ये होता. रॅलीच्या माध्यमातून त्याने फरहानवर दबाव कायम ठेवला. विशेषतः नेटजवळचा त्याचा खेळ पाहण्यासारखा होता. मागील दोन सामन्यांमध्ये ज्या ठिकाणी तो इंडोनेशियाच्या शटलरविरुद्ध अडचणीत आला होता, त्याच ठिकाणी यावेळी त्याने आपले कौशल्य सिद्ध केले. फ्रंट कोर्टवरील वेग आणि अचूक शॉट्सच्या जोरावर त्याने पहिला गेम २१-१२ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र फरहानने जोरदार पुनरागमन केले. आपला वेग आणि कोर्ट कव्हर करण्याच्या क्षमतेचा वापर करत त्याने लक्ष्यवर दबाव आणला. परिणामी, इंडोनेशियाच्या शटलरने दुसरा गेम २१-१५ असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये गेला. मात्र, महत्त्वाच्या क्षणी लक्ष्यने डोके शांत ठेवून खेळ केला. घाईघाईत आक्रमण न करता त्याने योग्य वेळेची वाट पाहिली. प्रतिस्पर्ध्याच्या बॅकहँडवर वारंवार लक्ष्य करण्यासोबतच अचूक स्मॅशने त्याने पॉईंट्स मिळवले. अखेर २१-११ च्या फरकाने तिसरा गेम जिंकून त्याने फायनलचे तिकीट निश्चित केले.
लक्ष्यची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी
शनिवारी मिळवलेल्या या विजयामुळे जर्मनीमध्ये (Germany) हायलो ओपन (Hylo Open 2026) जिंकल्यानंतर लक्ष्य आणखी एका बीडब्ल्यूएफ टूर फायनलमध्ये पोहोचला आहे. १ नोव्हेंबर रोजी हायलो ओपनच्या फायनलमध्ये त्याने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा (Jonatan Christie) २१-१७, २१-१० असा पराभव करून जेतेपद पटकावले होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर हे त्याचे पहिले बीडब्ल्यूएफ टूर जेतेपद होते. आता सलग दोन जेतेपदे जिंकणे हे लक्ष्यचे उद्दिष्ट आहे.












