चीनमध्ये नुकसानभरपाई न मिळाल्याने एका व्यक्तीने थेट बुलडोझर चालवून सरकारी इमारतच पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली असून, ही घटना शांक्सी प्रांतात घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या की 'बुलडोझर' हा शब्द नेहमीच चर्चेत असतो. विरोधक यूपीमध्ये 'बुलडोझर राज' असल्याचा आरोप करतात, तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी बुलडोझरचा वापर करतात. यूपीमध्ये बुलडोझरची एवढी चर्चा असते की तो एक ब्रँडच बनला आहे. पण आता फक्त यूपीतच नाही, तर चीनमध्येही बुलडोझरची चर्चा सुरू आहे! चीनमधून एक अशी बातमी समोर आली आहे, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. सरकारने नुकसानभरपाई दिली नाही म्हणून एका तरुणाने थेट बुलडोझरने सरकारी इमारतच पाडली!

कोणीही विचार केला नसेल अशी घटना!

एका हुकूमशाही कम्युनिस्ट देशातून अशी बातमी येईल, याची कोणीच अपेक्षा केली नसेल. पण हे खरं आहे. वायव्य चीनमधील शांक्सी प्रांतात असलेल्या फेंगडोंग न्यू सिटी गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटरवर बुलडोझर चालवण्यात आला. ९ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या व्यक्तीने बुलडोझरच्या साहाय्याने इमारतीचे प्रवेशद्वार आणि बाहेरील भागासह अनेक ठिकाणी मोठी तोडफोड केली. गावकऱ्यांना मिळायला हवी असलेली नुकसानभरपाई सरकारने दिली नाही, या रागातून त्याने हे पाऊल उचलल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

View post on Instagram
 

४७ वर्षीय व्यक्तीला अटक

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक पिवळ्या रंगाचा एक्सकव्हेटर (बुलडोझर) इमारतीच्या प्रवेशद्वारावर धडकताना आणि पायऱ्या व बोर्ड तोडताना दिसत आहे. या घटनेनंतर इमारतीमधील कर्मचारी आणि अभ्यागतांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जवळपास एक तास चाललेल्या या तोडफोडीत इमारतीच्या किमान सहा भागांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी 'हू' नावाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

नुकसानभरपाईचा वाद

या हल्ल्यामागचे नेमके कारण पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे सांगितलेले नाही. पण काही स्थानिक माध्यमांच्या मते, सरकारने 'हू' याचा गुरांचा गोठा पाडला होता, आणि त्याची नुकसानभरपाई त्याला मिळाली नव्हती. याच रागातून त्याने हे कृत्य केले. तर दुसरीकडे, गावकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न न सुटल्याने हा हल्ला झाल्याचेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. अर्थात, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि पोलीस तपास करत आहेत. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांतच सरकारी सेवा केंद्राचे कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले.