Global Crude Oil Prices Surge Near 120 Dollars : इराणमधील युद्धाची तीव्रता वाढल्याने तेल आणि आर्थिक बाजारांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आणि प्रति बॅरल 120 डॉलरच्या जवळ पोहोचल्या. 2022 नंतरची ही सर्वात मोठी दरवाढ आहे.

Global Crude Oil Prices Surge Near 120 Dollars : इराणमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याने तेल आणि आर्थिक बाजारांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आणि दर प्रति बॅरल 120 डॉलरच्या जवळ पोहोचले. 2022 नंतर झालेली ही सर्वात मोठी दरवाढ आहे.

गेल्या वर्षी कच्च्या तेलाची किंमत 64 डॉलरपर्यंत खाली आली होती. इतकंच नाही, तर युद्ध सुरू होण्यापूर्वी हा दर प्रति बॅरल 74 डॉलर होता. रविवारी कच्च्या तेलाची किंमत 92 डॉलर होती. याचा अर्थ, फक्त 10 दिवसांत किमतीत 46 डॉलरची आणि एकाच दिवसात 28 डॉलरची वाढ झाली आहे. यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

आखाती देशांतील प्रमुख तेल उत्पादकांनी उत्पादन कमी केले आहे. तसेच, इराणने आपल्यावरील हल्ल्याचा बदला म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यातच रविवारी इस्रायली सैन्याने इराणच्या 30 तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर (रिफायनरी) हल्ला केला. या सगळ्या कारणांमुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

किमती गगनाला भिडल्या:

ब्रेंट क्रूड ऑइलचा दर दिवसाच्या सुरुवातीला प्रति बॅरल $119.50 पर्यंत वाढला होता. मात्र, नंतर तो प्रति बॅरल 107.80 डॉलरवर स्थिरावला.

त्याचवेळी, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) या दुसऱ्या प्रमुख तेलाचा भाव प्रति बॅरल 119.48 डॉलरवर पोहोचला होता, पण नंतर तो 103 डॉलर प्रति बॅरलवर आला. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर या पातळीवर गेले होते. त्यानंतर एवढी मोठी वाढ पहिल्यांदाच झाली आहे.

युद्धाचा परिणाम:

‘रिस्टाड एनर्जी’ या स्वतंत्र संशोधन संस्थेनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे 15 दशलक्ष बॅरल कच्चे तेल (जगातील एकूण तेल पुरवठ्याच्या सुमारे 20%) वाहून नेले जाते. पण इराणमधील युद्धामुळे सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इराणमधून होणाऱ्या तेल आणि वायू वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारी जहाजे जवळपास थांबली आहेत.

कच्चे तेल निर्यात करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि यूएईने आपल्या तेल उत्पादनात कपात केली आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेने एकमेकांच्या तेल आणि वायू प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. यामुळे तेल पुरवठ्याची चिंता आणखी वाढली आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा भाव 10,549 रुपयांवर

नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील संकटामुळे तेलाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. भारतात फ्युचर्स मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या दरात तब्बल 26% वाढ होऊन तो प्रति बॅरल 10,549 रुपयांवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर मार्च डिलिव्हरीसाठीच्या कच्च्या तेलाच्या दरात 2186 रुपयांची वाढ झाली. शुक्रवारी हाच दर 8,363 रुपये प्रति बॅरल होता. विश्लेषकांच्या मते, येत्या काळात हा दर 11,300 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

LPG टंचाईची भीती: पुण्यातील स्मशानभूमीत इलेक्ट्रिक दाहिनीचा वापर

पुणे: मध्यपूर्वेतील युद्धामुळे LPG गॅसची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीने LPG ऐवजी इलेक्ट्रिक दाहिनीद्वारे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील नवी पेठेत 17 किलोमीटर परिसरात पसरलेल्या या स्मशानभूमीत दररोज किमान 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. LPG टंचाईच्या शक्यतेमुळे त्याचा वापर तात्पुरता थांबवण्यात आला असून, त्याऐवजी इलेक्ट्रिक दाहिनी वापरली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेलचे दर तूर्तास वाढणार नाहीत: केंद्र सरकार

नवी दिल्ली (पीटीआय): आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले असले तरी, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तूर्तास वाढ केली जाणार नाही, असे सरकारी सूत्रांनी सोमवारी स्पष्ट केले.

‘देशभरात इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. सरकार जागतिक तेल बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे, परंतु पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने वाढ करण्याची कोणतीही योजना नाही,’ असे सूत्रांनी सांगितले. तेल कंपन्या सध्याचा दरवाढीचा ताण सहन करतील अशी अपेक्षा आहे. सरकारने शुक्रवारीच LPG गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ केली होती.

उत्तर प्रदेशात LPG सिलेंडर 1500 रुपयांना!

लखनऊ: युद्धामुळे LPG आणि तेलाचे दर वाढतील आणि तुटवडा निर्माण होईल, अशा अफवा पसरल्या आहेत. काहीजण या परिस्थितीचा गैरफायदा घेत मनमानी दराने LPG विकत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रतापगढमध्ये एक LPG सिलेंडर 1500 रुपयांना विकला जात आहे.

7 मार्च रोजीचा एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात गॅस एजन्सीबाहेर शेकडो लोक रिकामे सिलेंडर घेऊन रांगेत बसलेले दिसत आहेत. अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. प्रतापगढमधील एका महिलेने आपली व्यथा मांडताना सांगितले, ‘काळ्या बाजारात 1,500 रुपयांना घरगुती LPG सिलेंडर खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. सध्या रमजानचा महिना आहे. आम्हाला घरात गॅसची गरज आहेच. त्यामुळे पर्याय नाही.’