तुर्कीच्या बुर्सा शहरात एका मांजराच्या पिल्लाला वाचवताना ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. ग्रिल तुटल्याने हा अपघात झाला असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना तुर्कीच्या बुर्सा शहरातील उस्मानगाझी (Osmangazi) भागात घडली. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास फेव्झी काकमेक (Fevzi Çakmak) रस्त्यावर हा अपघात झाला.
शाहीन तेझकान (Şahin Tezcan) हे एका बिझनेस सेंटरमधील ड्रायव्हिंग स्कूलमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत होते. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका मांजराच्या पिल्लाला वाचवण्याचा ते प्रयत्न करत होते. पिल्लाला काढण्यासाठी त्यांनी लोखंडी ग्रिलचा घट्ट आधार घेतला होता, पण अचानक ते ग्रिलच तुटलं आणि त्यांचा तोल गेला.
तोल गेल्याने तेझकान थेट डोक्यावरच खाली रस्त्यावर आदळले.
घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथक तातडीने तिथे पोहोचलं. त्यांनी घटनास्थळीच प्राथमिक उपचार केले आणि त्यांना लगेच रुग्णालयात दाखल केलं. पण दुर्दैवाने, शुक्रवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
तेझकान हे अविवाहित होते. शनिवारी बालिकेसिरच्या (Balıkesir) आयवलिक (Ayvalık) भागात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
