दुबईत ऑर्डर पोहोचवण्याच्या घाईत असतानाही रस्त्यावरील फुटलेल्या पाईपमधून वाहणारं पाणी थांबवणाऱ्या मोहम्मद परवेझ या भारतीय डिलिव्हरी बॉयचा सन्मान करण्यात आला आहे. स्वतःचं काम बाजूला ठेवून संभाव्य अपघात टाळल्याबद्दल दुबईच्या कामगार व्यवहार समितीने त्याचं कौतुक केलं.

दुबई: ऑर्डर पोहोचवण्याची कितीही घाई असली तरी माणुसकी विसरता कामा नये, हे एका भारतीय डिलिव्हरी बॉयने दाखवून दिलंय. रस्त्याच्या कडेला फुटलेल्या पाईपमधून वाहणारं पाणी थांबवणाऱ्या मोहम्मद परवेझ या डिलिव्हरी बॉयचा दुबई प्रशासनाने खास सन्मान केला आहे. हमद या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला होता.

मोहम्मद परवेझ हा 'डिलिव्हरू' (Deliveroo) कंपनीचा रायडर आहे. ग्राहकाला जेवण पोहोचवण्यासाठी तो घाईघाईत निघाला होता. त्याचवेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आणि गाड्या अडकत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. रस्त्याच्या कडेला झाडांना पाणी घालण्यासाठी असलेला पाईप फुटला होता आणि त्यातून प्रचंड वेगाने पाणी बाहेर येत होतं. यामुळे वाहनचालकांना त्रास होत होता आणि अपघाताचा धोकाही होता. हे पाहताच परवेझने स्वतःची ऑर्डर बाजूला ठेवली आणि तो मदतीसाठी धावला. कामाचा ताण आणि वेळेचं बंधन विसरून त्याने रस्त्यावर उतरून पाईपची गळती पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं याकडे लक्ष गेलं. अधिकाऱ्यांनी परवेझला जेबेल अली येथील 'परमनंट कमिटी ऑफ लेबर अफेअर्स'च्या (Permanent Committee of Labour Affairs) कार्यालयात बोलावून घेतलं. दुबई कामगार व्यवहार स्थायी समितीचे अब्दुल्ला लष्करी यांनी त्याचं कौतुक करत त्याला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू दिली. या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल परवेझने सर्वांचे आभार मानले आहेत.

View post on Instagram