२०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'नेव्हर सरेंडर' असा संदेश दिला आहे.
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो व्हाईट हाऊसने बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) 'X' वर शेअर केला. या फोटोवर "NEVER SURRENDER" (कधीही हार मानू नका) असा संदेश लिहिला आहे. २०२६ च्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर, विशेषतः इराणसोबत सुरू असलेल्या युद्धावर जोरदार टीका होत आहे. या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने मोठी मुसंडी मारली असून, अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांवर ते पुन्हा वर्चस्व मिळवतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
इराण संघर्ष आणि निवडणुकीवरील परिणाम
इराणसोबतच्या युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत फटका बसल्याचं ट्रम्प यांनी बुधवारी मान्य केलं. उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनीही या युद्धाचा मतदारांवर परिणाम झाल्याचं म्हटलं होतं, त्याला ट्रम्प यांनी दुजोरा दिला. इराण युद्धावरून व्हॅन्स यांनी केलेल्या दाव्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, हे "बऱ्याच अंशी खरं" आहे. पण त्याचवेळी, इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखण्यासाठी ही लष्करी कारवाई आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं.
ट्रम्प म्हणाले, "मला वाटतं हे बऱ्याच अंशी खरं आहे, कारण यामुळे अल्पावधीत पेट्रोलचे दर थोडे वाढले. पण त्याचवेळी, मला जर पुन्हा निर्णय घ्यायचा असेल, तर मी पुन्हा तेच करेन. कारण दीर्घकाळासाठी हाच एकमेव मार्ग आहे. तुम्ही इराणच्या हाती अण्वस्त्रे देऊ शकत नाही."
उमेदवारांची कामगिरी आणि पक्षांतर्गत मतप्रवाह
लोकप्रियतेबाबत ट्रम्प यांचं मत
आपली वैयक्तिक लोकप्रियता रिपब्लिकन उमेदवारांना मते मिळवून देण्यात कामी आली नाही, असा दावाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. आपल्या रॅलींमध्ये दिसणारा उत्साह इतर उमेदवारांच्या पारड्यात पडला नाही, असं ते म्हणाले. "जर मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असतो, तर आपण नक्कीच जिंकलो असतो. तुम्ही गर्दी पाहिली असेल—हजारो लोक तिथे उपस्थित होते... पण तुम्ही ते प्रेम दुसऱ्याकडे वळवू शकत नाही," असं ट्रम्प म्हणाले. युद्धापेक्षा इंधनाचे वाढलेले दर हेच मतदारांच्या नाराजीचे मुख्य कारण असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. तसेच, स्ट्रॅटेजिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
व्हॅन्स यांचं निरीक्षण
दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामागे इराण युद्ध हेच मुख्य कारण असल्याचं व्हॅन्स यांनी म्हटलं होतं. पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देत त्यांनी सांगितलं की, मतदार या युद्धाबद्दल, महागाईबद्दल, प्रशासनाच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाबद्दल आणि इस्रायलसोबतच्या अमेरिकेच्या संबंधांबद्दल चिंतेत होते.






