अमेरिकेत सध्या मिडटर्म इलेक्शनची (मध्यावधी निवडणुका) रणधुमाळी सुरू आहे. अशातच तिथल्या भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांची जोरदार धडपड पाहायला मिळत आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत मध्यावधी निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी उमेदवार भारतीय-अमेरिकन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यासाठी काही नेते चक्क भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन डोसा बनवत आहेत, तर काही जण मंदिरात जाऊन दिवाळीसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

डेमोक्रॅटिक उमेदवाराने बनवला डोसा

टेक्सासमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जेम्स टलारिको यांनी भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्यासाठी एका भारतीय रेस्टॉरंटला भेट दिली. डॅलसजवळील इर्विंगमधल्या या रेस्टॉरंटमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची मोठी गर्दी असते.

काळ्या रंगाचा सूट आणि पांढरा शर्ट घातलेल्या टलारिको यांनी गरम तव्यावर डोशाचं पीठ टाकून ते पसरवलं. त्यानंतर त्यात बटाट्याची भाजी टाकून डोसा दुमडला आणि केळीच्या पानावर सर्व्ह केला. टेक्सासमधील भारतीय-अमेरिकन समुदायाने टलारिको यांच्या या कृतीचं जोरदार स्वागत केलंय. विशेष म्हणजे, याच राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी आणि समर्थकांनी भारतीयांवर वर्णद्वेषी टीका केली होती, त्यामुळे टलारिको यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

मंदिरे आणि दिवाळीच्या कार्यक्रमांमध्ये नेत्यांची हजेरी

भारतीय-अमेरिकन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकेतील उमेदवार मंदिरे आणि दिवाळीच्या कार्यक्रमांनाही भेटी देत आहेत. कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमोंट यांनी राज्याच्या राजधानीत आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत उपसचिव जेनिफर बराहोना यादेखील उपस्थित होत्या.

ओहायोचे काँग्रेस सदस्य ग्रेग लँड्समन यांनी शेरॉनव्हिलमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या ११ व्या पाटोत्सवात सहभाग घेतला. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

न्यू जर्सीचे अमेरिकन सिनेटर कोरी बुकर यांनी अक्षरधाम मंदिरात झालेल्या दिवाळी साजरीकरणात भाग घेतला. तर काँग्रेस सदस्य रँडी फाईन आणि स्कॉट पेरी यांनी पेनसिल्व्हेनियातील हॅरिसबर्ग येथील एका मंदिराला भेट दिली.

मिशिगनचे काँग्रेस सदस्य जॉन जेम्स यांनीही स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन तिथल्या परंपरा आणि हिंदू-अमेरिकन समुदायाच्या सेवा कार्याबद्दल माहिती जाणून घेतली.

भारतीय-अमेरिकन मतदार का महत्त्वाचे आहेत?

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाची लोकसंख्या लक्षणीय आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, इलिनॉय, पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जिया या राज्यांमध्ये भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. जॉर्जिया, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन आणि नॉर्थ कॅरोलिनासारख्या राज्यांमध्ये निवडणुकीत अटीतटीची लढत होऊ शकते. अशा परिस्थितीत भारतीय-अमेरिकन मतदारांची मते निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव टाकू शकतात. याच कारणामुळे उमेदवार या समुदायाशी आपला संपर्क वाढवत आहेत.

अमेरिकेतील उमेदवारांचा निवडणूक प्रचार आता केवळ जाहीर सभांपुरता मर्यादित राहिलेला नाही. मंदिरे, सण आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.