अमेरिकेतील ६३ नॅशनल पार्क नातवासोबत फिरून इतिहास रचल्यानंतर आता या ९६ वर्षांच्या आजीने आणखी एक विक्रम केला आहे. त्यांनी नातू ब्रॅड रायन याच्यासोबत जगातील सातही खंडांना भेट दिली आहे.

वयाच्या ९६ व्या वर्षी 'ग्रँडमा जॉय' यांनी प्रवासाचा एक नवा विक्रम रचलाय. वय हा साहसासाठी अडथळा नसतो, हे त्यांनी सिद्ध केलंय. अमेरिकेतील सर्व ६३ नॅशनल पार्क नातू ब्रॅड रायन याच्यासोबत फिरल्यानंतर या ओहायोच्या आजींनी आता जगातील सातही खंडांना भेट देण्याचा एक विलक्षण टप्पा पार केला आहे.

सप्टेंबरमध्ये थायलंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करून या आजी-नातवाच्या जोडीने आपली जागतिक सफर नुकतीच पूर्ण केली. जॉय यांच्या प्रवासाच्या बकेट लिस्टमधील हे शेवटचे टप्पे होते.

पीपल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जॉय रायन (ज्यांना 'ग्रँडमा जॉय' म्हणून ओळखले जाते) म्हणाल्या, "शेवटी आपण प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, हा विचारच खूप छान होता."

ऑस्ट्रेलियातील अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, "तो खूप सुंदर देश आहे, आणि तिथले ते छोटे कोआला प्राणी — ते खूप गोड असतात."

आपण एवढा मोठा प्रवास करू, याची ९६ वर्षीय आजींनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे हे ध्येय गाठणं त्यांच्यासाठी खूप भावुक करणारं होतं. उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करताना जॉय म्हणाल्या, "बरं, म्हातारीने शेवटी हे करून दाखवलंच."

जॉय आणि त्यांचा ४५ वर्षीय नातू ब्रॅड (जो पेशाने पशुवैद्यक आहे) हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटवर धबधबे, मंदिरे आणि जगातील सर्वात सुंदर ठिकाणांचे चित्तथरारक फोटो पाहायला मिळतात.

ओहायोच्या या जोडीसाठी हा प्रवास केवळ फिरण्यापुरता मर्यादित नव्हता, तर अनेक वर्षांपासून दुरावलेली कौटुंबिक नाती जोडण्याचा आणि जुन्या जखमा भरून काढण्याचाही होता.

सायमन अँड शूस्टरने जूनमध्ये प्रकाशित केलेल्या 'Grandma Joy and Me: A Journey of Healing, One National Park at a Time' या पुस्तकात ब्रॅडने त्याच्या बालपणातील संघर्ष आणि आजीसोबतचं नातं कसं घट्ट होत गेलं, याचा उलगडा केला आहे.

अपलाचियाच्या पर्वतरांगांमध्ये वाढलेल्या ब्रॅडला खेळापेक्षा पुस्तके वाचायला आवडायची. आपण समलिंगी (gay) असल्याचं त्याला नंतर समजलं, पण त्याच्या वडिलांनी त्याचा स्वीकार केला नाही. वडिलांनी आईला घटस्फोट दिला आणि आता त्यांचं निधन झालं आहे.

या सगळ्याचा ब्रॅडच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. त्याने आजी जॉयसह वडिलांच्या कुटुंबापासून स्वत:ला दूर केलं होतं. तो सांगतो, "ते दुःख खूप खोल होतं."

जवळपास १० वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर २०१५ मध्ये ब्रॅडने पुन्हा आजीशी संपर्क साधण्याचं ठरवलं. त्याने आजीला एक साधा पण आयुष्य बदलून टाकणारा प्रश्न विचारला: 'ग्रेट स्मोकी माउंटन्समध्ये माझ्यासोबत कॅम्पिंगला येशील का?'

आजीने कधीही डोंगर पाहिलेला नाही, हे ब्रॅडला माहीत होतं. त्याला तिला निसर्गाची ओळख करून द्यायची होती.

त्या कॅम्पिंग ट्रिपमधून एका विलक्षण प्रवासाची सुरुवात झाली. दोघांनी अमेरिकेतील डझनभर नॅशनल पार्क पाहिले आणि मे २०२३ मध्ये त्यांची मोहीम पूर्ण केली.

पण त्यांचं साहस तिथेच थांबलं नाही. वयाच्या ९१ व्या वर्षी जॉय यांना त्यांचा पहिला पासपोर्ट मिळाला आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची दरवाजे उघडली गेली.

केनियात हत्ती पाहण्यापासून ते आयर्लंडमधील ऐतिहासिक किल्ले पाहण्यापर्यंत, या जोडीने विविध खंडांमधून प्रवास केला आणि अनेक आठवणी साठवल्या.

थायलंडच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात त्यांनी बौद्ध भिक्खूंशी संवाद साधला आणि तिथली भव्य मंदिरे पाहिली.

जॉय म्हणाल्या, "त्यांच्यासारख्या कुणालातरी भेटेन, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढला, हे खूप छान होतं." डंकन फॉल्समध्ये न आढळणारी ती मंदिरे पाहून त्या मंत्रमुग्ध झाल्या होत्या.

ब्रॅडसाठी एका तरुण बौद्ध भिक्खूसोबतचा संवाद खूप महत्त्वाचा ठरला.

ब्रॅड सांगतो, "त्या भिक्खूने आपल्या सर्वांच्या एकमेकांशी जोडले जाण्याबद्दल आणि भूतकाळात अडकून न राहण्याबद्दल सांगितलं. मी आयुष्यात खूप वेळ भूतकाळात अडकून राहिलो होतो."

४५ वर्षीय ब्रॅडने कबूल केलं की वाईट आठवणींमध्ये अडकून पडल्यामुळे त्याला खूप त्रास झाला. मात्र, आजीसोबतच्या या प्रवासाने त्याला पुढे जाण्यास आणि आयुष्यात 'आनंदाचा नवा अध्याय' सुरू करण्यास मदत केली.

ऑस्ट्रेलियातील अनुभवही अविस्मरणीय होता. जॉय यांना कोआला आणि त्यांची पिल्ले पाहून खूप आनंद झाला.

वयस्कर लोकांसाठी काम करणाऱ्या 'रोड स्कॉलर' या संस्थेच्या मदतीने या जोडीने त्यांच्या शेवटच्या दोन खंडांचा प्रवास पूर्ण केला.

या अनुभवाबद्दल बोलताना ब्रॅडने सांगितलं की, वृद्ध लोकांसोबत प्रवास केल्यामुळे म्हातारपणाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला आहे.

ब्रॅड म्हणतो, "हे जग प्रेरणादायी अशा ७०, ८० आणि ९० वर्षांच्या लोकांनी भरलेलं आहे, जे खूप छान जीवन जगत आहेत. जेव्हा तुम्ही अशा लोकांना भेटता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या म्हातारपणाकडे खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता."

जगाचा शोध घेण्याची संधी असताना लोकांनी म्हातारे होण्याची चिंता का करावी, असा सवालही त्याने विचारला.

आपल्या असंख्य प्रवासांबद्दल सांगताना जॉय म्हणाल्या की, धबधबे पाहणं त्यांना सर्वाधिक आवडतं.

त्या म्हणतात, "ते देवाने बनवले आहेत, आणि त्यात माणसाचा कोणताही हस्तक्षेप नाही."

सुंदर निसर्गासोबतच प्रवासात भेटलेल्या लोकांनीही त्यांच्यावर खोल छाप सोडली आहे. जॉय यांनी सांगितलं की, अनेक लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांचा प्रवास पाहून त्यांनाही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगतात.

जॉय आठवून सांगतात, "लोक मला म्हणतात, 'आम्ही एक नवा प्रवास सुरू केला आहे, आणि तो फक्त तुमच्यामुळे.' तेव्हा मी त्यांना धन्यवाद म्हणते. हे ऐकून मला खूप अभिमान वाटतो."