शनिवारी सकाळपासून ''TRUMP IS DEAD' हा ट्रेंड X वर ८०,०००+ पोस्टसह ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यांच्या हाताच्या जखमेच्या छायाचित्रांमुळे त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. व्हाइट हाऊसने आरोग्याबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या.
शनिवारी सकाळी ''TRUMP IS DEAD' हा शब्द X (माजी ट्विटर) वर जोरात ट्रेंड झाला आणि काही तासांतच ८०,००० पेक्षा जास्त पोस्ट्स झाल्या. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्येतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली. ट्रम्प हे सध्या ७९ वर्षांचे असून अमेरिकन इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्या जखमी उजव्या हाताचे फोटो ऑनलाईन व्हायरल झाल्यानंतर या अफवा अधिक वेगाने पसरल्या.
मात्र व्हाईट हाऊसने लगेचच या अफवा फेटाळून लावल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्रम्प पूर्णपणे तंदुरुस्त, सक्रिय असून आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत आहेत. तरीदेखील, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी एका मुलाखतीत दिलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा रंगली. त्यांनी म्हटले की, एखादी दुर्घटना घडलीच तर ते नेतृत्वाची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेत.

''TRUMP IS DEAD' अफवा आणि जेडी व्हान्स यांची नेतृत्वाची तयारी
''TRUMP IS DEAD' ही अफवा आणखी जोर धरु लावली जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी USA Today ला मुलाखत दिली. त्यांना विचारले गेले की, “कुठलीतरी मोठी दुर्घटना घडल्यास ते सर्वोच्च सेनापतीची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहेत का?” यावर व्हान्स (वय ४१), जे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात तरुण उपराष्ट्रपतींपैकी एक आहेत, यांनी सांगितले की ते पूर्णपणे तयार असल्याची त्यांना खात्री आहे.
व्हान्स म्हणाले, “मागच्या २०० दिवसांत मला चांगला अनुभव आला आहे. देव न करो, पण एखादी दुर्घटना घडली, तर त्यासाठी माझी तयारी आहे.” त्यांच्या या विधानाचा हेतू तयारी दाखवण्याचा असला तरी त्यामुळे ''TRUMP IS DEAD' या अफवेला आणखी चालना मिळाली.
तरीदेखील व्हान्स यांनी हे स्पष्ट केले की ट्रम्प यांची प्रकृती उत्तम आहे. ते रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी लवकरही ऊर्जेने काम करतात, वयामुळे त्यांची गती कमी झालेली नाही. पण सार्वजनिक आयुष्यात अनपेक्षित घटना घडू शकतात, असे त्यांनीही मान्य केले.
व्हाईट हाऊसची स्पष्टीकरणे
ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या अफवा काही महिन्यांपासून सोशल मीडियावर फिरत होत्या. अलीकडे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्यासोबतच्या बैठकीतील छायाचित्रांत ट्रम्प यांच्या उजव्या हातावर निळसर डाग दिसले. यापूर्वी फेब्रुवारीत मॅक्रॉन यांच्यासोबतच्या बैठकीत अशाच डागांचे फोटो व्हायरल झाले होते. जुलैमध्ये युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यासोबतच्या भेटीत हातावर मेकअप लावल्याचेही दिसून आले.
व्हाईट हाऊसने वारंवार या अफवा फेटाळल्या. पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दररोज हजारो लोकांना भेटतात, हस्तांदोलन करतात. त्यांचे समर्पण कायम असून ते रोज सिद्ध करतात.”
याशिवाय ट्रम्प यांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सीन बार्बाबेला यांनी दिलेल्या नोटमध्ये स्पष्ट केले की हातावरचा निळसर डाग हा वारंवार हस्तांदोलनामुळे झालेला सौम्य स्नायू-त्वचा त्रास असून ट्रम्प घेत असलेल्या अॅस्पिरीन औषधांमुळे तो अधिक दिसतो. यात कोणतेही गंभीर आजार (जसे रक्तवाहिन्यांचे विकार) आढळले नाहीत.
‘क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी’ निदान
जुलै महिन्यात ट्रम्प यांच्या पायांमध्ये सूज दिसल्यानंतर त्यांचे आरोग्य पुन्हा चर्चेत आले. त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी पुष्टी केली की ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी (शिरांमध्ये रक्त नीट न फिरण्याचा आजार) झाला आहे. हा आजार ७० वर्षांवरील लोकांमध्ये सर्वसामान्य आहे आणि योग्य उपचारांमुळे तो नियंत्रणात आहे.
तरीदेखील अलीकडील फोटोंमध्ये ट्रम्प यांच्या उजव्या हातावरील डाग आणि त्यावर लावलेला मेकअप दिसल्याने सोशल मीडियावर #TrumpIsDead हा हॅशटॅग आणखी पसरला.
ट्रम्प यांची स्वतःची प्रतिक्रिया
शनिवारी पहाटे ३.४० वाजता (भारतीय वेळेनुसार) ट्रम्प यांनी Truth Social वर काही पोस्ट्स शेअर केल्या. त्यात त्यांनी आपले आर्थिक धोरण व आगामी प्रचार मोहीम याबद्दल लिहिले. त्यांनी अफवांचा थेट उल्लेख केला नाही, पण त्यांच्या सक्रिय उपस्थितीचा तो पुरावा मानला गेला.
याआधीही ट्रम्प अनेक सभांमध्ये दिसले होते, जिथे त्यांनी तासन्तास भाषणे दिली. त्यांच्या समर्थकांच्या मते, हीच त्यांची तब्येत ठणठणीत असल्याची साक्ष आहे.
व्हान्स यांचे मत आणि भविष्यातील राजकारण
मुलाखतीत व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या राजकीय वारशाबद्दलही बोलले. ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की व्हान्स हे MAGA चळवळीचे (Make America Great Again) खरे वारसदार असतील. ट्रम्प यांनी भविष्यात व्हान्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या संयुक्त उमेदवारीची शक्यता व्यक्त केली होती.
तथापि, व्हान्स यांनी २०२८ मधील संधीबाबत तर्कांना फाटा दिला. ते म्हणाले की सध्या ते आणि त्यांची पत्नी उषा हे फक्त सध्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.
‘ओव्हल ऑफिस’ अनुभव
जानेवारीत पहिल्यांदा ओव्हल ऑफिसमध्ये गेलेल्या अनुभवाबद्दल व्हान्स म्हणाले, “तेथील इतिहास बघून भारावून गेलो. पण हिवाळ्यामुळे खिडक्या बंद होत्या, खोली अंधारी आणि उदास वाटत होती. हे मुक्त जगाच्या नेत्याचे कार्यालय आहे, ते अधिक उजळ असावे. ट्रम्प यांनी जे बदल केले ते मला आवडले.”
सोशल मीडियाची भूमिका
‘ट्रम्प मेले’ ही अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. अधिकृत नकार व वैद्यकीय स्पष्टीकरणे दिल्यानंतरही हा हॅशटॅग तासन्तास ट्रेंड होत राहिला. पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सामान्य वापरकर्त्यांमध्ये यावर चर्चा सुरू राहिली.


