Iran Missile Strike Hits Worlds Largest LNG Plant in Qatar : इराणने कतारमधील जगातील सर्वात मोठ्या गॅस प्लांटवर मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे प्लांट पूर्णपणे बंद झाला असून, भारतासह अनेक देशांचा गॅस पुरवठा धोक्यात आला आहे.

Iran Missile Strike Hits Worlds Largest LNG Plant in Qatar : इराणने कतारमधल्या रास लफान या जगातील सर्वात मोठ्या गॅस प्लांटवर मिसाइल हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर हा प्लांट पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हा प्लांट भारतासह अनेक देशांना गॅस पुरवठा करतो, त्यामुळे आता जगभरात गॅस पुरवठ्याचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे.

जीवितहानी नाही, पण प्लांट बंद

कतारमधील रास लफान हा जगातला सर्वात मोठा गॅस प्लांट आहे. यावर इराणने मिसाइलने हल्ला केला, ज्यामुळे प्लांटचं काम थांबवण्यात आलं आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. गॅस गळती होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. "इराण आखाती देशांना जाणूनबुजून लक्ष्य करत आहे आणि हे योग्य नाही. अनेकदा इशारा देऊनही इराणचे हल्ले थांबत नाहीत," असं कतारने म्हटलं आहे.

राग अमेरिका-इस्रायलवर, निशाण्यावर दुसरेच

इराण थेट अमेरिका किंवा इस्रायलवर हल्ला करू शकत नाहीये. अमेरिकेवर हल्ला करणं जवळपास अशक्य आहे, तर इस्रायलवर डागलेली मिसाइल्स तिथली 'आयर्न डोम' (Iron Dome) टेक्नॉलॉजी हवेतच निकामी करत आहे. त्यामुळे इराणने आता आपला मोर्चा आखाती देशांकडे वळवला आहे. या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत आणि इराणचं खरं लक्ष्य तेच आहे. पण अनेकदा हे हल्ले चुकतात आणि सामान्य वस्तीत किंवा महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन पडतात.

इराणने आधीच दिला होता हल्ल्याचा इशारा

अमेरिका आणि इस्रायलवरील रागापोटी आखाती देशांमधील तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ला करू, असा इशारा इराणने आधीच दिला होता. या इशाऱ्यानंतरच कतारच्या रास लफान गॅस प्लांटवर हा हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामुळे कतार प्रचंड संतापला आहे. कतारने आपल्या देशातील इराणी राजदूतांना २४ तासांच्या आत देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. "हा आमच्या सार्वभौमत्वावर आणि सुरक्षेवर झालेला हल्ला आहे. कतार हे सहन करणार नाही. वारंवार इशारे देऊनही इराणने जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागेल," असा सज्जड दम कतारने दिला आहे.