Car market : जागतिक स्तरावर भारतीय कार्सना वाढती मागणी आहे. 2025 मध्ये 858,000 युनिट्सची निर्यात करून भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने नवीन विक्रम प्रस्थापित केला. आफ्रिका, दक्षिण अमेरिका यांसारख्या बाजारपेठांमधील वाढत्या मागणीमुळे 15 टक्के वाढ झाली आहे.  

Car market : भारतामध्ये गाड्यांच्या विक्रीत चांगली वाढ नोंजवली जात आहे. त्यामुळे भारतीय रस्त्यांवरील गाड्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कार उत्पादक कंपन्या आपल्या ब्रँडची विविध मॉडेल्स जास्त आरामदायी करण्यावर भर देत आहेत. याचा लाभ भारतीयांबरोबरच विदेशातील नागरिकांनाही होत आहे. कारण, केवळ भारतच नव्हे तर, आता जागतिक स्तरावरही भारतीय गाड्यांची मागणी वाढत चालली आहे. 2025 मधील निर्यातीची आकडेवारी पाहिली असता, हेच लक्षात येते.

2025 हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी एक उल्लेखनीय वर्ष होते. यावर्षी भारतीय कार उत्पादकांनी परदेशी बाजारपेठांमध्ये विक्रमी संख्येने कार्सची निर्यात करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामागे आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम आशियामध्ये भारतीय कार्सची वाढती मागणी आणि एक उत्पादन केंद्र म्हणून भारताचे मजबूत झालेले स्थान ही कारणे आहेत.

2025 मध्ये भारताने 858,000 कार्सची निर्यात केली, ज्यात हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्हीसह सर्व मॉडेल्सचा समावेश आहे. 2024 च्या तुलनेत ही 15 टक्के वाढ आहे. यामागे मजबूत पुरवठा साखळी, कमी खर्च, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतात बनवलेल्या कार्सवरील वाढता विश्वास ही कारणे आहेत.

पुढील आव्हान

2026 हे वर्ष ऑटोमोबाईल उद्योगासाठी आव्हानात्मक असू शकते. ही गती कायम राहील की नाही, हे केवळ फॅक्टरी उत्पादनावरच नव्हे, तर व्यापार करारांवरही अवलंबून असेल. भारतीय कार निर्यातीची तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मेक्सिकोने 1 जानेवारी 2026 पासून दुप्पट दराने कर लागू केला आहे. जर दोन्ही देशांमध्ये लवकरच व्यापार करार झाला नाही, तर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.

जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये मागणी वाढली

2024 मध्ये सुमारे 15 टक्के असलेली प्रवासी वाहनांची निर्यात पुढील पाच वर्षांत एकूण उत्पादनाच्या 30 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे भारतीय कार कंपन्यांचे उद्दिष्ट आहे. युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित बाजारपेठांमध्येही भारताचा प्रभाव वाढत आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) नुसार, भारताचा ऑटो उद्योग आता जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत आता जगातील चौथा सर्वात मोठा ऑटोमोबाईल उत्पादक आणि तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ आहे.

मारुती सर्वात मोठा निर्यातदार

मारुती सुझुकीने अलीकडेच आपली पहिली इलेक्ट्रिक कार e-Vitara युरोपमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कंपनीला एकूण निर्यातीत 21 टक्के वाढ साधण्यास मदत झाली, जी 2025 मध्ये 395,000 युनिट्सवर पोहोचली. भारतातील 17 कार उत्पादकांपैकी, भारताच्या एकूण कार निर्यातीत मारुती सुझुकीचा वाटा 46 टक्के आहे. गेल्या पाच वर्षांत भारताची वार्षिक कार निर्यात दुप्पट झाली आहे. आकडेवारीनुसार, 2019 मधील 413,000 युनिट्सवरून 2020 मध्ये ही संख्या सुमारे 858,000 युनिट्स झाली आहे.