Car market : अनेक महिन्यांच्या विक्रीतील घसरणीनंतर, डिसेंबरमध्ये मारुती सुझुकीच्या अल्टो के10 आणि एस-प्रेसो सारख्या गाड्यांच्या विक्रीत 92 टक्के वाढ झाली. कमी किंमत आणि सवलतींमुळे या मॉडेल्सना ग्राहकांना अधिक पसंती दिली आहे.
Car market : भारताच्या रस्त्यांवर गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी बड्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. या बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय कार मार्केटवर पकड मिळविण्याचा प्रयत्न करत असताना मारुती सुझुकीने चांगली कामगिरी करत आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. 2025 हे वर्ष मारुती सुझुकीला विक्रीच्या दृष्टीने खूपच चांगले गेले आहे. या कंपनीच्या अनेक गाड्यांना ग्राहकांनी मोठी पसंती दिली.
अनेक महिन्यांच्या विक्रीतील घसरणीनंतर, डिसेंबरमध्ये मारुती सुझुकीच्या किफायतशीर गाड्यांची मागणी पुन्हा वाढली आहे. डिसेंबर 2025 मध्ये, मारुती सुझुकीने आपल्या मिनी सेगमेंटमध्ये 14,225 गाड्यांची घाऊक विक्री केली. मागील वर्षाच्या तुलनेत ही 92 टक्के वाढ आहे आणि 2025-26 आर्थिक वर्षातील या विभागातील ही सर्वाधिक विक्री आहे. यामध्ये सुमारे 10,800 युनिट्स अल्टो के10 च्या होत्या, तर एस-प्रेसोची विक्री 3,000 युनिट्सपेक्षा जास्त होती.
डिसेंबरमधील विक्रीबाबत मारुती सुझुकीचे मार्केटिंग आणि सेल्सचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी म्हणाले की, मिनी सेगमेंटमध्ये सुमारे 100 टक्के वाढ झाली आहे आणि दीड महिन्यांहून अधिक काळापासून बुकिंग प्रलंबित आहेत. कंपनीच्या मते, अल्टो के10 आणि एस-प्रेसोचा समावेश असलेल्या मिनी सेगमेंटने मारुतीच्या एकूण विक्रीत 6.2 टक्के योगदान दिले आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही संख्या 7,418 युनिट्स होती, जी नोव्हेंबरमधील 12,347 युनिट्सपेक्षा 15 टक्के जास्त आहे.
सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल्स
मारुतीच्या कॉम्पॅक्ट सेगमेंटमधील बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट आणि वॅगन आर या गाड्यांच्या विक्रीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपनीला अधिक बळकटी मिळाली. डिझायर कॉम्पॅक्ट सेडान, बलेनो प्रीमियम हॅचबॅक आणि वॅगन आर टॉल-बॉय हॅचबॅक हे मारुतीच्या एकूण विक्रीत सर्वाधिक योगदान देणारे मॉडेल्स आहेत. 2025 मध्ये डिझायर सर्वाधिक विकली जाणारी कार होती, तर डिसेंबरमध्ये 22,108 युनिट्स विकलेली बलेनो ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कार होती.
जीएसटी कमी केल्यानंतर कंपनीने अल्टो आणि एस-प्रेसोवर अतिरिक्त सवलत दिली होती. यामुळे या गाड्यांच्या किमती एक लाखापेक्षा जास्त कमी झाल्या. आता त्यांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत चार लाखांपेक्षा कमी झाली आहे. अल्टो के10 ची किंमत 3.70 लाख रुपयांपासून सुरू होते, तर कमी विक्री असलेल्या एस-प्रेसोची किंमत 3.50 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या मते, देशभरातील 100 शहरांमध्ये अल्टोची मागणी मजबूत आहे, तर लहान शहरे आणि गावांमध्ये अल्टो आणि एस-प्रेसोची विक्री आणखी वाढली आहे.


