सार
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीचे प्रयत्न सुरू असतानाही, इस्रायलने गेल्या आठवड्याच्या शेवटी लेबनॉनवर जोरदार हल्ले केले.
बेयरूत: दक्षिण बेयरूतवर सोमवारी इस्रायलने जोरदार हवाई हल्ला केल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे. या हल्ल्यात ३१ जण ठार झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण बेयरूत आणि परिसरातील २५ ठिकाणी हल्ले झाल्याचे इस्रायली सैन्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिजबुल्लाच्या केंद्रांवर हे हल्ले करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे.
हल्ल्यानंतर दक्षिण लेबनॉनमधील काही दूरचित्रवाणी दृश्ये काही वृत्तसंस्थांनी प्रसारित केली आहेत. येथून लोकांनी बाहेर पडावे, असे आवाहन इस्रायली सैन्याने आधीच केले होते. दक्षिण लेबनॉनमधील दोन जिल्ह्यांवर लढाऊ विमानांनी हल्ला केल्याचे लेबनीज माध्यमांनी वृत्त दिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धबंदीचे प्रयत्न सुरू असतानाही, इस्रायलने गेल्या आठवड्याच्या शेवटी लेबनॉनवर जोरदार हल्ले केले. शनिवारी गर्दीच्या बस्ता भागात झालेल्या हल्ल्यात किमान २९ जण ठार झाल्याची माहिती लेबनीज आरोग्य मंत्रालयाने दिली.
सोमवारी झालेल्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या कमांड सेंटरला लक्ष्य करण्यात आल्याचा इस्रायली सैन्याचा दावा आहे. दरम्यान, बेयरूतच्या आसपासच्या भागात ज्या भागातून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले नव्हते, तिथेही इस्रायलने हल्ला केला असून, लोकांच्या राहत्या इमारतींवर ड्रोन हल्ला करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.