हृदयविकाराचा महिलांवर वेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. छातीत दुखणे हेच एकमेव लक्षण नसते. महिलांमधील हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आणि धोके वेळीच समजून घेणे का गरजेचे आहे, ते जाणून घ्या.

हृदयविकार हा फक्त पुरुषांचा आजार आहे, असा आपला गैरसमज असतो. पण महिलांमध्येही आजारपण आणि मृत्यूचं हे एक प्रमुख कारण आहे, हे अनेकांना माहीत नसतं. संशोधनानुसार, मेनोपॉज (रजोनिवृत्ती) येण्यापूर्वी महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं. याचं कारण म्हणजे महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन (estrogen) हार्मोन. हे हार्मोन हृदयाचं रक्षण करतं. त्यामुळे महिलांना हृदयविकार होऊ शकतो, या शक्यतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. याच कारणामुळे महिलांमधील हृदयविकाराचं निदान व्हायला खूप उशीर होतो. परिणामी, हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होतात आणि काही वेळा मृत्यूही ओढवू शकतो.

महिलांमधील हृदयविकाराचे धोके: सामान्य विरुद्ध महिलांसाठी विशिष्ट

इस्ट्रोजेन हार्मोनमुळे महिलांना थोडं संरक्षण मिळत असलं तरी, इतर सर्व प्रमुख धोके पुरुष आणि महिला दोघांमध्येही सारखेच असतात. यामध्ये फॅमिली हिस्ट्री (अनुवांशिकता), हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि लठ्ठपणा यांचा समावेश होतो. पण याशिवाय, महिलांना काही विशिष्ट धोक्यांचाही सामना करावा लागतो, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. उदाहरणार्थ, PMOS (ज्याला आधी PCOS म्हटलं जायचं), ऑटोइम्यून आणि इतर दाहक (inflammatory) आजार हे प्रामुख्याने महिलांमध्येच आढळतात. काही वेळा, लवकर मेनोपॉज आल्यामुळे इस्ट्रोजेनचं संरक्षण कमी होतं आणि महिलांना हृदयविकाराचा धोका वाढतो.

गरोदरपणातील गुंतागुंत जसे की प्रीक्लेम्पसिया (preeclampsia), जेस्टेशनल डायबिटीस (gestational diabetes), गरोदरपणातील हाय ब्लड प्रेशर आणि स्पॉन्टेनियस कोरोनरी आर्टरी डायसेक्शन (SCAD) यांसारख्या समस्या फक्त महिलांमध्येच दिसून येतात. हे धोके स्त्री-पुरुष दोघांमध्ये आढळणाऱ्या सामान्य धोक्यांपेक्षा वेगळे आणि अतिरिक्त आहेत. दुर्दैवाने, वैद्यकीय क्षेत्रातही काही वेळा महिलांच्या या विशिष्ट धोक्यांचा योग्य अंदाज घेतला जात नाही. त्यामुळे महिलांमधील हृदयविकाराचं चुकीचं निदान होतं किंवा निदान व्हायला उशीर होतो. यासोबतच, महिलांमधील धूम्रपानाचं वाढतं प्रमाण हा आणखी एक मोठा धोका आहे, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.

लक्षणे

महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे नेहमीच्या लक्षणांपेक्षा थोडी वेगळी असू शकतात. अचानक श्वास घ्यायला त्रास होणे, खूप जास्त थकवा जाणवणे, मळमळ, उलट्या, अपचन, जबडा, पाठ किंवा मानेवर दाब जाणवणे, चक्कर येणे आणि थंड घाम येणे ही काही प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा या लक्षणांकडे चिंता (anxiety), मासिक पाळी किंवा इतर साध्या कारणांमुळे होत असल्याचं समजून दुर्लक्ष केलं जातं. हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल, याचा विचारही केला जात नाही. म्हणूनच, महिलांनाही हार्ट अटॅक आणि हृदयविकार होऊ शकतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जरी त्यांची लक्षणे वेगळी असली तरी ती ओळखता आली पाहिजेत. जेव्हा महिला अशा प्रकारची लक्षणे घेऊन येतात, तेव्हा डॉक्टरांनीही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि हृदयविकाराची शक्यता तपासून पाहिली पाहिजे.

- हा लेख मणिपाल हॉस्पिटल व्हाईटफिल्डचे कन्सल्टंट - इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, डॉ. प्रदीप हरनहळ्ळी यांनी लिहिला आहे.