डीमार्टसारख्या सुपरमार्केटमध्ये गेल्यावर ऑफर्स आणि आकर्षक मांडणीमुळे आपण अनेकदा नको त्या वस्तू खरेदी करतो. खरेदीला जाण्यापूर्वी मोबाईलवर लिस्ट बनवली आणि फक्त गरजेच्याच वस्तू घेतल्या, तर तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.
मुंबई : तुम्ही डीमार्टसारख्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये जाता, तेव्हा नकळत तुमचं बिल वाढतं का? डिस्काउंटच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी न करता स्मार्ट शॉपिंग कशी करायची, याच्या काही भन्नाट आयडिया आणि टिप्स इथे पाहा.
बिलाचा आकडा एवढा का वाढतो?
महिन्याचा पगार झाला की तुम्ही घरातल्या सामानाची लिस्ट बनवून शॉपिंगला निघता. फक्त गरजेच्या वस्तू घेऊ आणि हजार रुपयांत खरेदी उरकू, असा तुमचा विचार असतो. पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही बिलिंग काउंटरवर येता, तेव्हा हेच बिल २ ते ३ हजार रुपयांवर गेलेलं असतं.
अनेक कुटुंबांमध्ये हेच घडतं. याला फक्त डीमार्टला दोष देणं चुकीचं ठरेल. कारण मोठ्या सुपरमार्केटमध्ये वस्तूंची मांडणी, किमती, डिस्काउंटचे बोर्ड आणि आपल्या खरेदीच्या सवयींचा असा काही वापर केला जातो की, आपण गरजेपेक्षा जास्त वस्तू विकत घेतो.

सुपरमार्केटची नेमकी स्ट्रॅटेजी काय असते?
डीमार्टसह अनेक सुपरमार्केट 'एव्हरीडे लो प्राईस' (Everyday Low Price) ही स्ट्रॅटेजी वापरतात. या कंपन्या बाजारापेक्षा कमी किमतीत वस्तू विकतात. सुपरमार्केटमध्ये नवीन ऑफर किंवा डिस्काउंट दिसला की, ती वस्तू सध्या नको असली तरी तुम्ही ती विकत घेता. उदाहरणार्थ, तुमच्या घरात आधीच दोन साबण असतील, पण 'किंमत कमी आहे' म्हणून तुम्ही आणखी दोन साबण घेता. यामुळे तुमचं बिल आपोआप वाढतं.
कारण १० रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही नको तिथे १०० रुपये खर्च करता. तुम्ही तांदूळ, डाळ, तेल यांसारख्या रोजच्या वस्तू घ्यायला जाता. पण तिथेच तुम्हाला बिस्किटं, चॉकलेट्स, शाम्पू, कपडे किंवा घरातील इतर वस्तू एकाच छताखाली दिसतात. एवढ्या सगळ्या वस्तू पाहिल्यावर गरज नसतानाही तुम्ही एखादी जास्तीची वस्तू घेताच. आणि मग बिलाचा आकडा फुगतो.
खरेदीला जाण्यापूर्वी प्लॅनिंग करा
तुमच्याकडून जास्तीत जास्त वस्तू खरेदी करून घेण्याच्या उद्देशानेच सुपरमार्केटची रचना केलेली असते. दुकानाची डिझाईन आणि वस्तूंची मांडणी ग्राहकांच्या मनावर थेट परिणाम करते. ऑफर्स, नवीन प्रॉडक्ट्स आणि डिस्काउंट पाहिल्यावर तुम्ही लगेच खरेदी करता. तज्ज्ञ याला 'इम्पल्स बायिंग' (Impulse Buying) म्हणतात.
यावर एकच उपाय आहे. सुपरमार्केटमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये सामानाची लिस्ट तयार करा. खूपच गरज असेल तरच लिस्टबाहेरची वस्तू घ्या. फक्त डिस्काउंट आहे म्हणून काहीही विकत घेऊ नका. पुढचे ३० दिवस ज्या वस्तूचा वापर होणार नाही, ती वस्तू अजिबात घेऊ नका. विशेषतः लहान मुलांसोबत जाताना खेळणी आणि खाऊ घेण्यापूर्वी नक्की विचार करा.

पैसे वाचवायचेत? मग फक्त गरजेच्या वस्तू घ्या
डीमार्ट किंवा इतर कोणत्याही सुपरमार्केटमध्ये खऱ्या अर्थाने पैसे वाचवायचे असतील, तर फक्त आवश्यक वस्तूच खरेदी करा. नको त्या वस्तू घेणं टाळा. 'स्वस्तात मिळतंय' म्हणून जास्त वस्तू घेऊन पैसे वाया घालवू नका.
सुपरमार्केटमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या जवळच्या दुकानात किंवा ऑनलाईन त्या वस्तूची खरी किंमत तपासा. १०० रुपये वाचवण्यासाठी ५०० रुपये जास्तीचे खर्च केले, तर त्यात तुमची कोणतीही बचत होत नाही. महिन्याचं बजेट न बिघडवता फक्त गरजेच्या वस्तू घेतल्या, तर मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचा मोठा फायदा होऊ शकतो.

