व्हॉट्सॲप युजर्स आता पर्सनल किंवा ग्रुप चॅटमध्ये १४ दिवस आधीच मेसेज शेड्युल करू शकणार आहेत. तुम्ही ऑफलाइन असलात तरीही मेसेज ठरलेल्या वेळेत पोहचेल. आयओएस आणि अँड्रॉइड युजर्ससाठी हे फीचर जगभरात लाँच करण्यात आलं आहे.
व्हॉट्सॲप युजर्सना आता पर्सनल किंवा ग्रुप चॅटमध्ये मेसेज शेड्युल करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे तुम्ही ऑनलाइन नसलात तरीही तुमच्या निवडलेल्या तारखेला आणि वेळेत संबंधित व्यक्तीला मेसेज आपोआप पोहचेल. मेसेजिंग प्लॅटफॉर्मने बुधवारी आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड युजर्ससाठी हे नवीन फीचर जगभरात लाँच केलं आहे. या अपडेटमुळे युजर्स आता १० मिनिटांपासून ते १४ दिवस आधीपर्यंत कोणताही मेसेज शेड्युल करू शकतात.
मेसेज शेड्युल कसा करायचा?
टेकक्रंचच्या वृत्तानुसार, युजर्सना चॅटमध्ये मेसेज टाइप करून सेंड बटण दाबून धरल्यावर शेड्युल करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर मेसेज कधी आणि कोणत्या वेळेत पाठवायचा आहे, त्याची तारीख आणि वेळ तुम्ही सेट करू शकता. युजर्सनी शेड्युल केलेले सर्व मेसेज त्यांना पाहता येतील आणि गरज नसल्यास ते डिलीटही करता येतील. मात्र, एकदा शेड्युल केल्यानंतर मेसेज पाठवण्याची वेळ बदलता येईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या अपडेटची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, युजरचा फोन बंद असेल किंवा इंटरनेट बंद असेल तरीही शेड्युल केलेला मेसेज अचूक वेळेवर सेंड होईल. युजर्स टेक्स्ट मेसेजसोबत फोटो आणि व्हिडीओही शेड्युल करू शकतात. व्हॉट्सॲपने एका ब्लॉग पोस्टमध्ये या फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर युजर्सच्या 'सर्वाधिक अपेक्षित फीचर्सपैकी' एक असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. 'शेड्युल केलेल्या मेसेजच्या माध्यमातून योग्य वेळी संवाद साधा' (Say it at the right time with scheduled messages) अशा शीर्षकाच्या ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने हा नवीन पर्याय कसा वापरायचा याची माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये म्हटलंय, 'कोणताही मेसेज शेड्युल करण्यासाठी सेंड बटण दाबून ठेवा आणि मेसेज पोहचवण्याची तारीख व वेळ निवडा.'
मेसेज शेड्युल करण्याचे फायदे
या फीचरच्या मदतीने आता योग्य वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं अधिक सोपं होणार आहे, विशेषतः अशा लोकांसाठी जे वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये राहतात. याशिवाय, व्यापारी त्यांच्या ग्राहकांसाठी मेसेज आणि अपडेट्स प्लॅन करू शकतील. तसेच, जे लोक कामासाठी व्हॉट्सॲप वापरतात, ते त्यांच्या टीमसाठी रिमाइंडर्स आणि अपडेट्स शेड्युल करू शकतात.
















