नव्या ह्युंदाई व्हर्नाने भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलं आहे. प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षिततेत या गाडीने दमदार कामगिरी केली आहे. २० अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स असलेली ही कार या सेगमेंटमधील पहिली ५-स्टार रेटिंग मिळवणारी मॉडेल ठरली आहे.
भारताच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत ह्युंदाईच्या नव्या व्हर्नाने मोठा टप्पा गाठला आहे. भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat NCAP) क्रॅश टेस्टमध्ये नव्या ह्युंदाई व्हर्नाने ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवलं आहे. यामुळे या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त सेफ्टी रेटिंग मिळवणारी व्हर्ना पहिली कार ठरली आहे. प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या टेस्टमध्ये व्हर्नाला ३२ पैकी २८.२२ पॉईंट्स मिळालेत. तर, मुलांच्या सुरक्षिततेत ४९ पैकी ४४ पॉईंट्स मिळालेत. व्हर्नाची एचएक्स ८ १.५ लिटर टर्बो पेट्रोल डीसीटी आणि १.५ लिटर पेट्रोल सीव्हीटी व्हेरिएंट भारत NCAP क्रॅश टेस्टसाठी पाठवण्यात आली होती. पण, मिळालेले हे ५-स्टार सेफ्टी रेटिंग व्हर्नाच्या सर्व व्हेरिएंट्ससाठी लागू असणार आहे.
प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेत दमदार परफॉर्मन्स
फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये चालकाचे डोके आणि मान सुरक्षित ठेवण्यात व्हर्नाने चांगली कामगिरी केली. मात्र छाती, पायाचा टीबिया भाग आणि तळपायाची सुरक्षितता समाधानकारक होती. चालक आणि पुढच्या सीटवरील सहप्रवाशाच्या पेल्विस आणि मांडीची सुरक्षितता सरासरीपेक्षा कमी होती.
सहप्रवाशाचे डोके, मान, छाती आणि डाव्या पायाच्या टीबियाला चांगली सुरक्षितता मिळाली. उजव्या टीबियाची सुरक्षितता समाधानकारक असल्याचं सांगण्यात आलं आहे. साईड पोल इम्पॅक्ट टेस्टमध्ये शरीराच्या सर्व भागांना व्हर्नाने चांगली सुरक्षितता दिली. साईड क्रॅश टेस्टमध्ये डोके, पोट आणि पेल्विसला चांगली सुरक्षितता मिळाली असली, तरी छातीची सुरक्षितता समाधानकारक होती.
मुलांच्या सुरक्षिततेतही पैकीच्या पैकी गुण
मुलांच्या सेफ्टी टेस्टमध्येही व्हर्नाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. १८ महिने आणि तीन वर्षांच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डमीचा वापर करून फ्रंटल क्रॅश टेस्टमध्ये या कारला आठपैकी आठ गुण मिळाले. साईड क्रॅश टेस्टमध्येही चारपैकी चार गुण मिळालेत. डायनॅमिक चाईल्ड प्रोटेक्शन टेस्टमध्ये २४ पैकी २४ पॉईंट्स आणि मुलांसाठी सेफ्टी सीट बसवण्याच्या टेस्टमध्ये १२ पैकी १२ पॉईंट्स मिळवले आहेत.
सुरक्षिततेसाठी अनेक भन्नाट फीचर्स
सेफ्टी सिस्टिमच्या बाबतीत नवी व्हर्ना अगदी खणखणीत आहे. यात २० फीचर्स असलेली ह्युंदाई स्मार्ट सेन्स लेव्हल २ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) मुख्य आकर्षण आहे. गाडीत ड्रायव्हर, पॅसेंजर, साईड, कर्टन आणि सेंटर साईड असे एकूण सात एअरबॅग्स देण्यात आलेत.
याशिवाय डॅशकॅम, पावसाची जाणीव ठेवणारे वायपर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशनसुद्धा आहे.
चारही चाकांना डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, सराउंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (TPMS) आणि ISOFIX चाईल्ड सीट अँकर हे सेफ्टी फीचर्सही या कारमध्ये आहेत.
सुरक्षितता हीच प्राथमिकता: ह्युंदाई
ह्युंदाई मोटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ तरुण गर्ग म्हणाले की, "व्हर्नाला मिळालेले ५-स्टार भारत NCAP रेटिंग हे कंपनी सुरक्षिततेला किती महत्त्व देते, याचा पुरावा आहे." त्यांनी पुढे सांगितलं की, "भारतीय ग्राहकांना उच्च दर्जाची सुरक्षितता आणि आधुनिक सेफ्टी टेक्नॉलॉजी देण्याचे आमचे वचन या यशातून स्पष्ट होतं." गर्ग यांच्या मते, नवी व्हर्ना डिझाईन, टेक्नॉलॉजी, परफॉर्मन्स आणि सेफ्टीचं उत्तम कॉम्बिनेशन आहे.














