केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम सेंटरने इशारा दिला आहे की, सार्वजनिक किंवा शेअर केलेल्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरून लॉग आऊट करायला विसरल्यास, इतर लोक तुमचे चॅट्स वाचू शकतात आणि तुमच्या नावाने मेसेजही पाठवू शकतात.
मुंबई : जर तुम्ही सार्वजनिक किंवा शेअर केलेल्या कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरत असाल, तर तुमचं अकाउंट धोक्यात येऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरने याबद्दल एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.
या ॲडव्हायझरीमध्ये सांगितलंय की, व्हॉट्सॲप वेब वापरल्यानंतर जर तुम्ही लॉग आऊट करायला विसरलात, तर त्याचा कसा गैरवापर होऊ शकतो. सेशन ॲक्टिव्ह राहिल्यास, तो कॉम्प्युटर वापरणारी दुसरी व्यक्ती तुमचे सगळे चॅट्स वाचू शकते. एवढंच नाही, तर तुमच्या नकळत तुमच्या नावाने इतरांना मेसेजही पाठवू शकते.
सुदैवाने, व्हॉट्सॲपने हे चेक करण्याचा एक सोपा मार्ग दिला आहे. 'लिंक्ड डिव्हाइसेस' सेक्शनमध्ये तुमच्या अकाउंटशी जोडलेले सगळे कॉम्प्युटर आणि डिव्हाइसेस दिसतात. विशेष म्हणजे, तुम्ही मूळ कॉम्प्युटरला हात न लावता तुमच्या फोनवरूनच हे सेशन रिमोटली बंद करू शकता.
अँड्रॉइडवर हे तपासण्यासाठी: व्हॉट्सॲप उघडा, वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा आणि 'लिंक्ड डिव्हाइसेस' निवडा. आयफोनवर: व्हॉट्सॲप उघडा, 'सेटिंग्ज'मध्ये जा आणि 'लिंक्ड डिव्हाइसेस'वर टॅप करा. इथे तुम्हाला कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसची यादी दिसेल. यात एखादा अनोळखी कॉम्प्युटर, ब्राउझर किंवा डिव्हाइस दिसल्यास, त्यावर टॅप करून 'लॉग आऊट' निवडा.
तुमच्या व्हॉट्सॲपवर दुसऱ्या कुणाचं तरी नियंत्रण आहे, हे ओळखण्याची ५ लक्षणं आहेत: १. 'लिंक्ड डिव्हाइसेस'मध्ये अनोळखी डिव्हाइस दिसणं. २. तुम्ही न पाठवलेले मेसेज (विशेषतः लिंक्स किंवा पैशांची मागणी) दिसणं. ३. तुमच्या नंबरवरून संशयास्पद मेसेज येत असल्याचं तुमच्या कॉन्टॅक्ट्सने सांगणं. ४. तुम्ही सुरू न केलेल्या संभाषणांचे रिप्लाय येणं. ५. तुमच्या अकाउंटवर अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी दिसणं, जी तुम्ही केलेली नाही. फक्त फोनवरील ॲप चालतंय, याचा अर्थ अकाउंट सुरक्षित आहे असा होत नाही.
जर एखादं अनोळखी डिव्हाइस दिसलं, तर त्वरित त्याला लॉग आऊट करा आणि तुमच्या परवानगीशिवाय काही मेसेज गेले आहेत का, ते तपासण्यासाठी अलीकडचे चॅट्स तपासा. जर तुमच्या अकाउंटवरून संशयास्पद मेसेज गेले असतील, तर तुमच्या कॉन्टॅक्ट्सना त्याबद्दल सांगा. जेणेकरून ते कोणत्याही धोकादायक लिंकवर क्लिक करणार नाहीत, वैयक्तिक माहिती शेअर करणार नाहीत किंवा तुमच्या नावाने कुणाला पैसे पाठवणार नाहीत.
याशिवाय, व्हॉट्सॲप, फोनची ऑपरेटिंग सिस्टीम आणि ब्राउझर नेहमी अपडेटेड ठेवणं फायद्याचं ठरतं. अनोळखी ठिकाणाहून काहीही डाऊनलोड करणं किंवा संशयास्पद अटॅचमेंट्स उघडणं टाळा.
शेअर केलेल्या कॉम्प्युटरवर आर्थिक, अधिकृत किंवा गोपनीय कामांसाठी व्हॉट्सॲप वेब वापरू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे. काम झाल्यावर तिथून उठण्यापूर्वी नेहमी मॅन्युअली लॉग आऊट करा, कारण फक्त ब्राउझर टॅब बंद केल्याने सेशन नेहमीच बंद होत नाही.
















