नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो भाविक श्री माता वैष्णोदेवीच्या दरबारात दाखल होत आहेत. रियासी आणि उधमपूरमधील प्रशासनाने भाविकांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
नव्या वर्षांची सुरुवात श्री माता वैष्णोदेवीच्या दर्शनाने व्हावी, अशी तिच्या भाविकांची इच्छा असते. त्यामुळे यंदाही २०२६ या नववर्षांच्या पहिल्या दिवशी देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक कटरा येथे दाखल झाले आहेत. देशभरातून इथे मोठ्या संख्येने दाखल झालेले भाविक आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करणार आहेत. कटरावाली माता वैष्णोदेवी मनापासून प्रार्थना करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. आध्यात्मिक भावनेने जमलेल्या लाखो भाविकांमुळे परिसरात चैतन्यमय वातावरण आहे
इथे दर्शनासाठी आलेल्या भाविकाने सांगितले, "मी खूप उत्साही आणि आनंदी आहे.कारण. देवीच्या दर्शनाने माझे नवीन वर्ष सुरू होईल. सध्या इथले हवामान खूप चांगले आहे. मुंबईत असे हवामान नसते. त्यामुळे इथल्या आल्हाददायक वातावरणाचा आम्ही खरोखर आनंद लुटत आहोत.’’
भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त
३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचे काही दिवस इथे प्रचंड गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, रियासीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) परमवीर सिंग, JKPS यांनी श्री माता वैष्णोदेवी भवनात भाविकांची सुरक्षा आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व संबंधित अधिकारी आणि एजन्सींना भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सतर्क आणि सक्रिय राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. चेंगराचेंगरीसारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी आणि भवन परिसरातील संवेदनशील ठिकाणी हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिलेल्या आहेत.
उधमपूर पोलिसांकडून नवीन वर्षासाठी मार्गदर्शक सूचना जारी
उधमपूरमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष करण्यासाठी नागरिक बाहेर पडतात. तसेच अनेक पर्यटक येत असतात. यामुळे स्थानिक पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उत्सवाचा आनंद लुटा. मात्र धोकादायक ड्रायव्हिंग करू नका, असे आवाहन स्थानिक पोलिस प्रशासनाने केले आहे.
उधमपूरचे पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) प्रल्हाद कुमार म्हणाले, "नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, आम्ही CRPF, लष्कर, जिल्हा पोलीस आणि ITBP यासह विविध एजन्सींशी समन्वय साधला आहे आणि चेक पोस्ट उभारले आहेत. पर्यटकांनी कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करू नये किंवा पदार्थ जवळ बाळगून प्रवास करू नये. कोणतेही स्टंट करू नये किंवा गोंधळ घालू नये.
गर्दी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी ॲप्लिकेशन्सचा योग्य वापर केला जात आहे. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (ICCC) द्वारे संशयास्पद हालचालीवर सतत देखरेख ठेवली जात आहे. प्रभावी गर्दी नियंत्रणासाठी रिअल-टाइम समन्वय, जलद प्रतिसाद आणि तत्काळ निर्णय घेण्याच्या सूचना इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला दिल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
पोलिस प्रशासन व संबंधित सर्व विभागांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, योग्य समन्वय ठेवावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार राहावे. ज्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाता येईल.


