- Home
- Utility News
- Nag Panchami 2025 : नागपंचमीला महाराष्ट्रात हे पारंपरिक पदार्थ बनवतात, पहिला पदार्थ बघूनच तोंडाला सुटेल पाणी
Nag Panchami 2025 : नागपंचमीला महाराष्ट्रात हे पारंपरिक पदार्थ बनवतात, पहिला पदार्थ बघूनच तोंडाला सुटेल पाणी
मुंबई - उद्या मंगळवारी (दि. २९ जुलै) नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी महाराष्ट्रात खास पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. आज हे पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीज आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत.

पारंपरिक पद्धतीने वाफवलेले पदार्थ
नागपंचमीचा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष स्थान आहे आणि नागपंचमी हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो. 2025 साली नागपंचमी 29 जुलै रोजी आहे. या दिवशी विशेष पूजा केली जाते आणि विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात या दिवशी काही खास पारंपरिक, पारंपरिक पद्धतीने वाफवलेले आणि पौष्टिक पदार्थ केले जातात. चला जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी कोणते खास पदार्थ बनवले जातात..
गव्हाची खीर
गव्हाची खीर ही नागपंचमीसाठी विशेषतः पौष्टिक आणि पारंपरिक मानली जाते. गहू, गूळ, दूध आणि सुकामेवा यामध्ये असतो.
कृती:
गहू 2-3 तास भिजवून त्याचे मिश्रण तयार करावे.
तुपात हे मिश्रण परतून, दूध, पाणी घालून चांगले शिजवावे.
गूळ, वेलची पूड, जायफळ पूड घालून खीर तयार करावी.
वरून सुकामेवा टाकून गरमागरम खीर नैवेद्यासाठी सजवावी.
पातोळ्या
कोकण भागात खास करून नागपंचमीसाठी पातोळ्या बनवल्या जातात. हळदीच्या पानांमध्ये नारळ-गूळाचे सारण भरून तयार केलेला वाफवलेला पदार्थ.
कृती:
तांदळाच्या पिठात मीठ आणि गरम पाणी घालून मळावे.
नारळ व गूळ एकत्र करून त्यात वेलची पूड मिसळावी.
हळदीच्या पानावर तांदळाच्या पिठाचा पातळ थर लावावा, त्यावर सारण पसरवून पान दुमडावे.
हे पान वाफात १०-१५ मिनिटे ठेवून पातोळ्या तयार कराव्यात.
पुरणाचे दिंड
पुरणाचे दिंड म्हणजे पुरणपोळीचा वाफवलेला पर्याय. नागपंचमीच्या दिवशी कढई, चाकू, सुरी, तवा यांचा वापर टाळला जातो, म्हणून भाजून किंवा तव्यावर न करता वाफवलेले दिंड तयार केले जातात.
कृती:
चणाडाळ शिजवून घ्या. गूळ वितळवून दोन्ही एकत्र करा.
वेलची, जायफळ पूड, थोडेसे मीठ टाकून पुरण तयार करा.
गव्हाचे पीठ पाण्यात मळून थोडे मऊसर ठेवा.
लहान गोळे करून पारी लाटावी आणि त्यात पुरण भरून दिंडाचा आकार द्यावा.
वाफात १८-२० मिनिटे शिजवा.
उकडीचे कानोळे
हेही वाफवलेले गोड पदार्थ असून तांदळाचे नाही, तर गव्हाच्या पीठाचे केले जातात.
कृती:
गव्हाचे पीठ, गूळ आणि थोडे तेल घालून पीठ मळून घ्यावे.
त्याचे छोटे गोळे करून त्रिकोणी कानोळे तयार करावेत.
हे कानोळे कुकरमध्ये किंवा इडली पात्रात वाफवून शिजवले जातात.
उकडीचे मोदक
उकडीचे मोदक हे नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात आवर्जून केला जाणारा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. तांदळाच्या पिठाची बाह्य आवरण आणि नारळ-गूळाचे गोड सारण यात असते. हे मोदक वाफवून बनवले जातात आणि श्री गणेशालाही प्रिय असतात.
कृती:
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात नारळ आणि गूळ घालून एकजीव होईपर्यंत परतावे.
नंतर वेलची आणि जायफळ पूड घालून मिश्रण थंड होऊ द्यावे.
पाणी गरम करून त्यात मीठ टाकून तांदळाचे पीठ मिसळून चांगले मळून घ्यावे.
पीठाचे छोटे गोळे करून त्याला वाटीचा आकार देऊन सारण भरावे आणि मोदकाचा आकार द्यावा.
हे मोदक १५-२० मिनिटे वाफवावे.

