म्युच्युअल फंडात योग्य माहिती घेऊन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. गेल्या तीन वर्षांत, विशेषतः गोल्ड म्युच्युअल फंडांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. यात १ लाखाची गुंतवणूक २.५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. या लेखात UTI, SBI आणि Axis च्या टॉप-५ फंडांची माहिती दिली आहे.

मुंबई : म्युच्युअल फंड 'सही है' असं म्हटलं जातं, पण पुरेशी माहिती न घेता गुंतवणूक केली तर धोकाही तितकाच असतो. पण जर तुम्ही योग्य माहिती घेऊन आणि अभ्यास करून पैसे गुंतवले, तर चांगला नफा कमावू शकता. अनेकांनी यातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. तुम्ही तीन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या म्युच्युअल फंडांच्या शोधात आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.

व्हॅल्यू रिसर्चच्या एका स्टडीनुसार, जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढत असल्यामुळे भारतीय गोल्ड म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे. गेल्या ३ वर्षांत ज्या ग्राहकांनी १ लाख रुपये गुंतवले, त्यांना तब्बल २.५० लाखांपर्यंत रिटर्न्स मिळाले आहेत. SBI, UTI आणि ॲक्सिससारख्या मोठ्या कंपन्यांच्या टॉप-५ गोल्ड फंडांनी वार्षिक सरासरी २५ टक्क्यांपेक्षा जास्त CAGR दराने वाढ नोंदवली आहे.

यूटीआय गोल्ड ईटीएफ (UTI Gold ETF FoF)

यूटीआय म्युच्युअल फंडाच्या या योजनेने गेल्या ३ वर्षांत सरासरी ३६.१४% वार्षिक परतावा दिला आहे. म्हणजे, तीन वर्षांपूर्वी तुम्ही या योजनेत १ लाख रुपये एकरकमी गुंतवले असते, तर आज त्याचं मूल्य २.५२ लाख रुपये झालं असतं.

क्वांटम गोल्ड ईटीएफ (Quantum Gold ETF FoF)

क्वांटम म्युच्युअल फंडाच्या या स्कीमने गेल्या ३ वर्षांत वार्षिक सरासरी ३५.९८ टक्के परतावा दिला आहे. यात केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य आज २.५१ लाख रुपये झालं आहे.

एसबीआय गोल्ड फंड (SBI Gold Fund)

देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या SBI च्या या योजनेने ३ वर्षांत वार्षिक ३५.७७ टक्के दराने वाढ दर्शवली आहे. यात १ लाख रुपये गुंतवलेल्या ग्राहकांची रक्कम आता २.५० लाख रुपये झाली आहे.

ॲक्सिस गोल्ड फंड (Axis Gold Fund)

ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या या गोल्ड स्कीमने गेल्या ३ वर्षांत दरवर्षी ३५.२० टक्के रिटर्न्स दिले आहेत. या फंडाने १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीला २.४७ लाख रुपये बनवलं आहे.

एचएसबीसी मिड-कॅप फंड (HSBC Midcap Fund)

हा गोल्ड फंड नसला तरी, इक्विटी मिड-कॅप प्रकारात या फंडाने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या ३ वर्षांत या फंडाने २५.११ टक्के CAGR दिला आहे. यामध्ये गुंतवलेले १ लाख रुपये आज १.९५ लाख रुपये झाले आहेत.