एमजी विंडसर ईव्हीला टक्कर देण्यासाठी टाटा मोटर्स 'कुनो' या कोडनेमखाली एक नवी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही आणत आहे. Acti.ev प्लॅटफॉर्मवर तयार होणारी ही गाडी 2027-2028 च्या दरम्यान बाजारात येण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात आपला दबदबा आणखी वाढवण्यासाठी टाटा मोटर्स एक नवं मॉडेल आणत आहे. टाटा कुनो या कोडनेमखाली विकसित होत असलेली ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. ही नवी गाडी थेट एमजी विंडसर ईव्हीला टक्कर देईल. 2027 किंवा 2028 मध्ये ही गाडी बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने अद्याप लाँचच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या टियागो ईव्ही, पंच ईव्ही, नेक्सॉन ईव्ही, हॅरियर ईव्ही आणि सिएरा ईव्ही या मॉडेल्सच्या माध्यमातून टाटाने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. या लाइनअपमध्ये नव्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची भर पडल्याने बाजारातील स्थान आणखी बळकट करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
प्रॉडक्शन-रेडी व्हर्जनला कुनो या कोडनेमऐवजी नवं नाव दिलं जाईल, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. टाटाच्या सध्याच्या मॉडेल लाइनअपमध्ये या नव्या गाडीचं स्थान नेक्सॉन ईव्ही आणि सिएरा ईव्हीच्या मध्ये असेल. या गाडीचं उत्पादन गुजरातमधील साणंद प्लांटमध्ये होणार आहे.
Acti.ev प्लॅटफॉर्मवर नवी एसयूव्ही
कुनो इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटाच्या Acti.ev आर्किटेक्चरवर आधारित असेल. या प्लॅटफॉर्ममुळे केबिनमधील जागेचा जास्तीत जास्त वापर करता येतो आणि ऊर्जेची कार्यक्षमता वाढते, असा कंपनीचा दावा आहे.
हे आर्किटेक्चर इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) वाहने आणि इलेक्ट्रिक वाहने या दोन्हीसाठी योग्य अशा पद्धतीने विकसित करण्यात आलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या बॅटरी पॅक्स, वाहनांचे आकार, ड्राइव्ह सिस्टीम आणि चार्जिंग सुविधांचा समावेश करता येतो. या प्लॅटफॉर्मवर तयार होणारी इलेक्ट्रिक वाहने एका चार्जवर 600 किलोमीटरपर्यंत धावू शकतील, असा टाटाचा दावा आहे. ही गाडी 11 kW एसी चार्जिंग आणि 150 kW पर्यंतच्या डीसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या प्लॅटफॉर्ममध्ये फ्रंट-व्हील ड्राइव्ह, रिअर-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमचाही समावेश करता येईल.
Curvv EV ची पॉवरट्रेन मिळणार का?
नव्या रिपोर्ट्सनुसार, टाटा कुनोला Curvv EV किंवा Sierra EV ची पॉवरट्रेन मिळण्याची शक्यता आहे. सध्या Curvv EV बाजारात 55 kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. या गाडीमध्ये फ्रंट ॲक्सलवर इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. एका चार्जवर 502 किलोमीटरची रेंज मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. दुसरीकडे, टाटा सिएरा ईव्हीमध्ये 65 kWh रिअर-व्हील ड्राइव्ह, 75 kWh रिअर-व्हील ड्राइव्ह आणि 75 kWh ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह असे वेगवेगळे पॉवरट्रेन पर्याय आहेत. याची रेंज 665 किलोमीटरपर्यंत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
टाटा कुनोची किंमत किती असेल?
टाटा कुनोची किंमत Curvv EV आणि Sierra EV च्या किमतीच्या आसपास असण्याची अपेक्षा आहे. सध्या Curvv EV ची एक्स-शोरूम किंमत 17.19 लाख ते 19.39 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर सिएरा ईव्हीची किंमत 18.79 लाख ते 25.99 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
या गाडीची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या एमजी विंडसर ईव्हीची किंमत 14.85 लाख ते 19.15 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या किमतींचा विचार करता, टाटा कुनोची किंमतही याच रेंजमध्ये असण्याची शक्यता आहे. मात्र, बॅटरीची क्षमता, पॉवरट्रेन, व्हेरियंट्स आणि अंतिम किमतीबाबत टाटाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 2027-2028 च्या दरम्यान बाजारात येण्याची अपेक्षा असलेल्या या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या अधिक माहितीची वाहनप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.












