Study Abroad : परदेशात शिक्षण आणि पार्ट-टाइम जॉबसाठी टॉप १० देश
परदेशात शिकायचा विचार करताय? उच्च शिक्षणासोबतच पार्ट-टाइम जॉब करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आम्ही टॉप १० देशांची यादी आणि तिथले वर्क परमिटचे नियम सोप्या भाषेत सांगत आहोत.

परदेशात नोकरीच्या संधी
ग्लोबल करिअर करण्यासाठी अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहतात. जगात अनेक देश चांगलं शिक्षण देतात, पण शिक्षण आणि नोकरी या दोन्हीसाठी योग्य देश निवडणं हे मोठं आव्हान असतं. तुम्ही निवडलेला देश तुमच्या भविष्यातील संधींवर मोठा परिणाम करतो. आपण अशा १० सर्वोत्तम देशांची माहिती घेणार आहोत, जिथे भारतीय विद्यार्थी शिक्षणासोबतच पार्ट-टाइम जॉब सहज करू शकतात. सोबतच तिथले वर्क परमिटचे नियमही जाणून घेऊया.

अमेरिका आणि लंडन
अमेरिकेत F-1 व्हिसा असलेले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कॅम्पसमध्ये पार्ट-टाइम जॉब करू शकतात. कॉलेज सुरू असताना तुम्हाला आठवड्याला २० तास काम करण्याची परवानगी मिळते.
यूकेमध्ये टियर 4 स्टुडंट व्हिसा असलेले विद्यार्थीही शिक्षणासोबत पार्ट-टाइम काम करू शकतात. इथे तुम्ही आठवड्याला १० ते २० तास काम करू शकता. यूके सरकार कामाच्या तासांचे नियम खूप कडक पाळते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही वेळ मर्यादा कधीही ओलांडू नये.
स्विडन आणि स्वित्झर्लँड
स्वित्झर्लंडमध्ये पार्ट-टाइम जॉब करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विशेष वर्किंग परमिटची गरज असते. युरोपियन युनियनचे देश, आइसलँड, लिक्टनस्टाईन आणि नॉर्वेच्या विद्यार्थ्यांना कामाच्या तासांची कोणतीही मर्यादा नाही. पण इतर देशांतील विद्यार्थी कॉलेज सुरू असताना आठवड्याला फक्त १० ते १५ तास काम करू शकतात. सुट्ट्यांमध्ये तुम्ही फुल-टाइम काम करू शकता.
स्वीडनमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथेच राहून काम करायचं असेल, तर वर्क परमिट लागतं. इथे शिकताना कामाच्या तासांवर कोणतीही कायदेशीर मर्यादा नाही. पात्र विद्यार्थ्यांना आठवड्याला ४० तासांपर्यंत काम करण्याची परवानगी सहज मिळते.
जपान आणि जर्मनी
जपान आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क व्हिसा देतो. या व्हिसावर तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यावर एक वर्षापर्यंत काम करू शकता. विशिष्ट निकषांवर तुम्ही हा व्हिसा वाढवूही शकता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगला अनुभव मिळतो. इथे शिकताना विद्यार्थी आठवड्याला २८ तासांपर्यंत काम करू शकतात.
जर्मनीमध्ये विद्यार्थी विशेष वर्क परमिटशिवाय काम करू शकतात. फेडरल एम्प्लॉयमेंट एजन्सी आणि फॉरेनर्स ऑफिसची परवानगी घेऊन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वर्षाला २४० अर्धे दिवस किंवा १२० पूर्ण दिवस पार्ट-टाइम काम करू शकतात. चांगला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मनी अनेक स्कॉलरशिप्सही देतो.
फ्रान्स आणि डेन्मार्क
फ्रान्समध्ये रेसिडेन्सी कार्ड असेल आणि शैक्षणिक संस्थेने सोशल सिक्युरिटी सिस्टीमचा अॅक्सेस दिला असेल, तर विद्यार्थी कॅम्पसमध्ये किंवा बाहेर काम करू शकतात. इथे तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त ९६४ तास काम करू शकता.
डेन्मार्कमध्ये ग्रॅज्युएशननंतर नोकरीसाठी अर्ज करताना वर्क परमिट किंवा एस्टॅब्लिशमेंट कार्ड लागतं. शिक्षण सुरू असताना तुम्हाला आठवड्याला २० तास पार्ट-टाइम काम करण्याची परवानगी मिळते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही फुल-टाइम कामही करू शकता.
कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया
कॅनडामध्ये शिकताना काम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 'डेझिग्नेटेड लर्निंग इन्स्टिट्यूशन'मध्ये फुल-टाइम विद्यार्थी म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे. इथे तुम्हाला आठवड्याला २० तास काम करण्याची परवानगी मिळते. तुमच्याकडे ऑफ-कॅम्पस कामाची परवानगी देणारा स्टडी परमिट असणंही गरजेचं आहे. तसेच विद्यार्थ्यांना सोशल सिक्युरिटी नंबर मिळवावा लागतो.
ऑस्ट्रेलियन सरकार स्टुडंट व्हिसावर असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम काम करू देतं. स्टुडंट व्हिसाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असताना दर दोन आठवड्यांनी ४० तासांपर्यंत काम करण्याचा अधिकार मिळतो आणि सुट्ट्यांमध्ये ते फुल-टाइम काम करू शकतात.

