- Home
- Utility News
- Sushil Singh Success Story : सुरक्षा रक्षकाचा पोरगा बनला आज 3 कंपन्यांचा मालक, 12 वी नापास तरुणाची अत्यंत प्रेरणादायी कहाणी
Sushil Singh Success Story : सुरक्षा रक्षकाचा पोरगा बनला आज 3 कंपन्यांचा मालक, 12 वी नापास तरुणाची अत्यंत प्रेरणादायी कहाणी
Success Story: सुरक्षा रक्षकाचा मुलगा म्हणून गरिबीत जन्म, शिक्षणात अडथळे, 11 हजार पगारापासून करिअरची सुरुवात करून आज तीन कंपन्यांचा मालक बनलेल्या सुशील सिंह यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

12वीत नापास, 11 हजारांचा पगार... पण आज कोटींचं साम्राज्य!
यश एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे खूप कष्ट, अश्रू आणि प्रचंड मेहनत असते. शालेय शिक्षणात अपयशी होण्यापासून ते फक्त 11,000 रुपये पगारावर काम करण्यापर्यंत, सुशील सिंह यांनी अनेक अडचणींचा सामना केला. पण आज ते तीन यशस्वी कंपन्यांचे मालक आहेत आणि अनेकांसाठी आदर्श बनले आहेत.
अपयश हा शेवट नसतो, तर यशाची पहिली पायरी असते, हे सुशील सिंह यांच्या प्रवासातून सिद्ध होते. उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात गरिबीत जन्मलेले आणि मुंबईतील एका चाळीत वाढलेले सुशील, कठोर परिश्रम, हुशारीचे निर्णय आणि अतूट धैर्याने टप्प्याटप्प्याने पुढे गेले. कॉलेज ड्रॉपआऊट ते करोडपती बनलेल्या सुशील सिंह यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी एक आदर्श आहे.
छोट्या गावातून मोठ्या स्वप्नांकडे सुशील सिंह यांचा प्रवास -
सुशील सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचे आयुष्य सोपे नव्हते. गरिबी आणि आर्थिक अडचणी त्यांच्या कुटुंबाच्या पाचवीला पुजलेल्या होत्या. तरीही, सुशील यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आणि काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहिले. याच स्वप्नाने त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली. उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी पुरेशी साधनं नसली तरी, त्यांचा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही.
मुंबईच्या चाळीतील आयुष्य, सुरक्षा रक्षकाचा मुलगा म्हणून प्रवास -
रोजगारासाठी सुशील यांचे कुटुंब मुंबईत आले. तिथे ते डोंबिवलीतील एका लहानशा चाळीत राहत होते. मुंबईसारख्या महानगरात जगणे सोपे नव्हते. सुशील यांचे वडील एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे आणि आई घर सांभाळायची.
वडिलांच्या तुटपुंज्या पगारावरच घर चालायचे. पैशांची खूप चणचण भासत असे. प्रत्येक लहान-सहान गरजेसाठीही विचार करावा लागायचा. गरिबी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली होती. पण याच अडचणींनी सुशील यांना अधिक कणखर बनवले.
शिक्षणात मागे, पण प्रयत्न सोडले नाहीत -
शिक्षण हे सुशील यांच्यासाठी एक मोठे आव्हान होते. शाळेत ते अभ्यासात खूप मागे होते. सुरुवातीला ते परीक्षेत नापासही झाले. मित्र आणि शेजाऱ्यांसमोर त्यांना खूप अपमानस्पद वाटले, पण त्यांनी हार मानली नाही. एक वर्ष पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करून, अखेर ते 12वी उत्तीर्ण झाले. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आपण काहीही करू शकतो, असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला.
आवड नसतानाही, जबाबदारीसाठी शिक्षण -
शिक्षणात फारसा रस नसतानाही, भविष्याचा विचार करून सुशील यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर, प्रॅक्टिकल कौशल्ये असल्यास चांगल्या नोकरीची संधी मिळेल या विचाराने त्यांनी पॉलिटेक्निकचा कोर्सही केला. इतर तरुण व्यावसायिकांप्रमाणेच सुशील यांनीही आपल्या करिअरची सुरुवात एका एन्ट्री-लेव्हल नोकरीने केली. त्यांचा पहिला पगार फक्त 11,000 रुपये होता. पण कमी पगाराने निराश न होता, त्यांनी त्या नोकरीला शिकण्याची एक संधी मानले. तिथे शिकलेले धडेच त्यांना भविष्यात एक यशस्वी उद्योजक बनण्यास उपयोगी पडले.
पत्नीच्या येण्याने नशीब बदलले -
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सरिता रावत यांच्याशी लग्न झाल्यानंतर सुशील यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळाले. दोघांनी मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील एका व्यावसायिकाशी भागीदारी करून, त्यांनी नोएडामध्ये 'SSR Techvision' नावाची BPO कंपनी सुरू केली.
सुरुवातीला त्यांनी को-वर्किंग स्पेसमध्ये फक्त 8 डेस्क असलेल्या ऑफिसमधील 4 जागा भाड्याने घेऊन कंपनी सुरू केली. त्यांच्या कष्टाला फळ मिळाले. अवघ्या अडीच वर्षांत कंपनीने प्रचंड प्रगती केली.
इतकी की, त्यांनी नोएडामध्ये एक संपूर्ण इमारत खरेदी केली. SSR Techvision च्या यशानंतर सुशील यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी 'Deebaco' नावाचा ग्लोबल B2C ऑनलाइन कपड्यांचा ब्रँड लाँच केला. 2019 मध्ये, त्यांनी 'Cyva Systems Inc' ही तिसरी मल्टिनॅशनल आयटी कन्सल्टिंग कंपनी सुरू केली. एकेकाळी शाळेची फी भरायलाही पैसे नसलेली व्यक्ती, आज तीन कंपन्यांचा मालक बनून अनेकांना रोजगार देत आहे.

