तुमच्या पोळ्या काही तासांतच कडक आणि वातड होतात का? पोळ्या तासनतास मऊ राहाव्यात यासाठी पीठ मळण्यापासून ते भाजण्यापर्यंत आणि स्टोअर करण्यापर्यंतच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.

गरमागरम पोळी ताटात आली की मऊ असते, पण थोड्या वेळाने ती वातड आणि कडक का होते? हा आपल्या सगळ्यांच्याच घरातला प्रश्न आहे. पण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या पोळ्या तासनतास मऊ राहतील.

सुरुवात करा योग्य कणकेपासून

सगळ्यात आधी, पोळ्यांसाठी गव्हाचं पीठ घ्या आणि त्यात हळूहळू कोमट पाणी घालून मळा. पीठ घट्ट न मळता मऊ आणि गुळगुळीत मळलं पाहिजे. यामुळे पिठात पाणी व्यवस्थित मुरतं. पीठ मळून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून ते १५ ते ३० मिनिटं मुरू द्या. यामुळे पीठ चांगलं सेट होतं.

पोळ्या जळू न देता अशा भाजा

पोळी लाटून झाल्यावर तवा मध्यम ते हाय फ्लेमवर चांगला गरम करून घ्या. त्यानंतर त्यावर पोळी टाका. एका बाजूला थोडे बुडबुडे येऊ लागले की पोळी पलटा. पोळी तव्यावर जास्त वेळ भाजू नका. जास्त भाजल्यास पोळीतला ओलावा निघून जातो आणि त्या कोरड्या होतात. पोळ्या भाजून झाल्यावर लगेच एका बंद डब्यात ठेवा.

पोळ्या नेहमी झाकून ठेवा

भाजलेल्या पोळ्या उघड्या ठेवल्यास हवेमुळे त्यातील ओलावा नाहीसा होतो. त्यामुळे पोळ्या कधीही ताटात उघड्या ठेवू नका, तर त्या सुती कापडात गुंडाळून किंवा पोळीच्या डब्यात ठेवा. जास्त काळ पोळ्या मऊ ठेवायच्या असतील, तर तुम्ही एअरटाइट डब्याचा वापर करू शकता.

थोडेसे तूप चव वाढवेल

गरम पोळीला थोडंसं तूप लावल्यास तिची चव तर वाढतेच, पण पोतही सुधारतो. तुपामुळे पोळीतला ओलावा टिकून राहतो आणि ती अधिक मऊ लागते.

मऊ पोळ्यांसाठी हा आहे सीक्रेट फॉर्म्युला

थोडक्यात सांगायचं तर, मऊ पोळ्यांसाठी पिठात व्यवस्थित मुरलेलं पाणी, पिठाला दिलेली पुरेशी विश्रांती, योग्य पद्धतीने भाजणे आणि भाजल्यावर लगेच झाकून ठेवणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

हे पण वाचा: टम्म फुगलेल्या आणि कुरकुरीत पुऱ्या हव्यात? घरी परफेक्ट पुरी बनवण्यासाठी हे सोपे सीक्रेट्स फॉलो करा