आजकालच्या गाड्या या फक्त प्रवासाचं साधन नसून त्या स्मार्ट फीचर्स आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहेत. पण यामुळेच कार हॅक होण्याचा धोकाही वाढला आहे. मोबाईल ॲप्स, स्मार्ट की आणि वायरिंगच्या मदतीने हॅकर्स तुमच्या गाडीचं नियंत्रण मिळवू शकतात. मात्र, काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही तुमच्या कारचं सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करू शकता.

आजकालच्या गाड्या म्हणजे फक्त प्रवासाची साधनं राहिलेली नाहीत, तर त्या चकाचक फीचर्सने भरलेले चालतेफिरते कॉम्प्युटर झाले आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्ट की, मोबाईल ॲप कंट्रोल अशा अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा नव्या कार्समध्ये पाहायला मिळतात. पण या वाढत्या सोयींसोबतच सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढतोय हे विसरून चालणार नाही. सुरक्षेत थोडी जरी चूक झाली, तरी तुमची कार हॅकर्सच्या रडारवर येऊ शकते.

एका साध्या फॅमिली एसयूव्हीमध्येही आता 50 ते 100 च्या आसपास इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (ECU), किलोमीटरच्या लांबीचं कॅन (CAN) वायरिंग आणि लाखो सॉफ्टवेअर कोड्स असतात. कारमधील इंटरनेट मॉडेल सतत कंपनीच्या सर्व्हरशी कनेक्टेड असतं. त्यामुळे मोबाईल ॲपवरून इंजिन चालू करणं, एसी कंट्रोल करणं, जीपीएस ट्रॅकिंग किंवा दरवाजे लॉक-अनलॉक करणं शक्य होतं.

पण याच कनेक्टेड सिस्टीममुळे हॅकर्सना गाडीत घुसखोरी करण्याचे नवनवीन मार्ग सापडले आहेत. मोबाईल ॲप्स, वायरिंग, स्मार्ट की आणि डायग्नोस्टिक पोर्ट्सचा वापर करून सायबर भामटे कारला लक्ष्य करू शकतात.

मोबाईल ॲप्सवरून कार हॅक होऊ शकते का?

ह्युंदाई ब्लूलिंक, टाटा आयआरए (iRA), महिंद्रा ॲड्रेनॉक्स, मारुती सुझुकी कनेक्ट, एमजी आय-स्मार्ट यांसारख्या सिस्टीम्स गाडीला कंपनीच्या क्लाउड सर्व्हरशी जोडतात. जर या सिस्टीमच्या API सुरक्षेत काही त्रुटी असेल, तर हॅकर्स गाडीचं लोकेशन ट्रॅक करू शकतात, दरवाजे उघडू शकतात किंवा हॉर्नही वाजू शकतात.

वायरिंगमध्ये छेडछाड करून ताबा मिळवणं

गाडीतील विविध इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स कॅन (CAN) नेटवर्कद्वारे एकमेकांशी जोडलेल्या असतात. जर एखाद्या हॅकरने हेडलाईट्स किंवा बंपर सेन्सर्सच्या वायरिंगचा ॲक्सेस मिळवला, तर तो खोटी सिग्नल्स पाठवू शकतो. याचा वापर करून गाडीची लॉकिंग सिस्टीम आणि इमोबिलायझर हॅक करण्याचा धोका असतो.

स्मार्ट की हॅकर्सच्या टार्गेटवर

ज्या गाड्यांमध्ये स्मार्ट की असते, तिथे 'रिले अटॅक' (Relay Attack) द्वारे चोरीचा धोका जास्त असतो. यात दोन भामटे खास उपकरणांचा वापर करतात. घरात ठेवलेल्या स्मार्ट कीचं सिग्नल एक भामटा टिपतो आणि दुसरा ते सिग्नल गाडीजवळ पास करतो. गाडीला वाटतं की चावी जवळच आहे आणि ती अनलॉक होते.

ओबीडी (OBD) पोर्टचाही मोठा धोका

डॅशबोर्डच्या खाली असलेल्या ओबीडी-2 (OBD-2) पोर्टचा वापर करूनही चोरी होऊ शकते. हॅकर्स याला विशेष डिव्हाईस जोडून नवीन चावी प्रोग्राम करू शकतात किंवा इमोबिलायझरच्या सेटिंग्स बदलू शकतात.

चालू गाडी हॅक करता येते का?

चित्रपटांमध्ये जसं दाखवतात की धावत्या गाडीचं स्टिअरिंग आणि ब्रेक्स रिमोटवरून कंट्रोल केले जातात, तसं प्रत्यक्ष आयुष्यात करणं सोपं नाही. आधुनिक कार्समध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि इंजिन/ब्रेक्ससाठी वेगवेगळे नेटवर्क असतात. तसेच, सेंट्रल गेटवे फायरवॉल संशयास्पद कमांड्स लगेच ब्लॉक करतो. तरीही, कार चोरीला जाणं, वैयक्तिक डेटा लीक होणं आणि गाडीत अनधिकृत प्रवेश हे हल्लीचे मुख्य सुरक्षेचे धोके आहेत.

भारतातील कार सायबर सिक्युरिटीचे नियम

गाड्यांची सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतात AIS-189 आणि AIS-190 हे नवीन नियम लागू केले आहेत. सुरक्षित हार्डवेअर, संवादाची सुरक्षितता आणि सायबर सिक्युरिटी टेस्टिंगवर AIS-189 भर देतं. तर ओव्हर द एअर (OTA) सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये छेडछाड होऊ नये, याची काळजी AIS-190 घेतं.

कार हॅकिंग टाळण्यासाठी काय करावं?

गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी मालकांनी काही सोप्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. स्मार्ट कीचं सिग्नल हॅक होऊ नये म्हणून घरात ती फॅराडे पाऊचमध्ये (Faraday pouch) ठेवा. स्टिअरिंग लॉक किंवा पेडल लॉक वापरल्याने चोरीचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

ओबीडी-2 पोर्टचा गैरवापर टाळण्यासाठी त्याला खास लॉक बसवता येतं. गाडी कंट्रोल करणाऱ्या मोबाईल ॲप्सना मजबूत पासवर्ड आणि बायोमेट्रिक सुरक्षेचा थर द्या. डॅशकॅम किंवा इतर ॲक्सेसरीज बसवताना गाडीचं मूळ वायरिंग कापू नका, त्याऐवजी प्लग-अँड-प्ले (plug and play) कनेक्टर्सचा वापर करा.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गाडीचं सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहा. या छोट्याशा गोष्टीही तुमची कार सायबर हल्ले आणि चोरीपासून वाचवण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात.