Indian Railways : इंडियन रेल्वेचा मोठा निर्णय? RAC तिकीट रद्द करण्याच्या तयारीत
Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठे बदल होणार का? अनेक दशकांपासून सुरू असलेली RAC तिकीट सुविधा रद्द करण्याचा विचार भारतीय रेल्वे करत असल्याची माहिती मिळत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RAC तिकीट रद्द करण्याचा विचार का सुरू आहे?
रेल्वेमध्ये RAC तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना पूर्ण तिकीट दर भरावा लागतो. पण त्यांना वेगळा बर्थ मिळत नाही. एकाच साईड लोअर बर्थवर दोन प्रवाशांना सामावून घेतलं जातं. दिवसा दोघांना बसण्यासाठी त्याचा वापर करावा लागतो, तर रात्री एकाच बर्थवर दोघांना झोपावं लागतं.
पूर्ण तिकीट काढूनही झोपण्याची सोय मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. विशेषतः महिला आणि पुरुष प्रवाशांना एकत्र बर्थ दिल्यावर अडचणी येतात. अशावेळी दुसरा बर्थ देणं तिकीट तपासनीस (TTE) लाही कठीण जातं. या अडचणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन RAC पद्धत बंद करण्याचा विचार करत आहे.

RAC तिकिटांबाबत संसदीय समितीचं मत काय?
RAC तिकीट असलेल्या प्रवाशांकडून पूर्ण भाडे आकारण्यावर संसदीय समितीनेही आक्षेप घेतला आहे. वेगळा बर्थ न देता दोघांना एकच बर्थ देणं आणि पूर्ण पैसे घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल समितीने केला. रेल्वेने या पद्धतीचा पुनर्विचार करावा, अशी सूचना समितीने केली आहे. पूर्ण बर्थची सोय न मिळणाऱ्या प्रवाशांकडून पूर्ण भाडे घ्यायचे की नाही, हे तपासण्याची शिफारस केली. यामुळे RAC पद्धतीवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सध्याच्या पद्धतीत बदल गरजेचा असल्याचे मत व्यक्त होत आहे.
रेल्वेमध्ये RAC म्हणजे काय? हे कसं काम करतं?
RAC म्हणजे रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. तिकीट रद्द झाल्यावर बर्थ मिळण्याची शक्यता असलेली ही पद्धत आहे. ही कन्फर्म तिकीट आणि वेटिंग लिस्टच्या मध्ये असते. कन्फर्म तिकीट असलेल्यांना वेगळा बर्थ मिळतो. वेटिंग लिस्ट वाल्यांना तिकीट कन्फर्म न झाल्यास रिझर्व्हेशन बोगीतून प्रवास करता येत नाही. पण RAC तिकीट असलेले रिझर्व्हेशन बोगीतून प्रवास करू शकतात.
या पद्धतीत दोन प्रवाशांना एकच साईड लोअर बर्थ दिला जातो. दिवसा ते सीट म्हणून वापरतात, रात्री तोच बर्थ शेअर करावा लागतो. कन्फर्म तिकीट असलेल्याने तिकीट रद्द केल्यास, तो रिकामा झालेला बर्थ RAC प्रवाशाला दिला जातो. त्यामुळे RAC तिकीट कन्फर्म बर्थमध्ये बदलतं. हे तिकीट रद्द होण्यावर आणि बर्थ उपलब्ध असण्यावर अवलंबून असतं.
RAC पद्धत मुळात का आणली?
पूर्वी रेल्वे रिझर्व्हेशन प्रामुख्याने मॅन्युअली व्हायचं. प्रवाशांनी ऐनवेळी तिकीट रद्द केल्यास, रिकामे झालेले बर्थ शोधून इतरांना देणं सोपं नव्हतं. अशावेळी रिकाम्या राहिलेल्या बर्थचा वापर व्हावा आणि जास्त प्रवाशांना प्रवास करता यावा, यासाठी RAC पद्धत आणली गेली.
त्यानंतर कम्प्युटराईझ्ड रिझर्व्हेशन सिस्टम आली. यामुळे रद्द झालेली तिकिटे आणि रिकाम्या बर्थची माहिती सहज मिळून इतरांना देणं शक्य झालं. तरीही तेव्हापासून सुरू असलेली RAC पद्धत आजही रेल्वे रिझर्व्हेशनचा भाग आहे.
RAC तिकिटे रद्द होणार का?
RAC पद्धत रद्द करण्याचा विचार रेल्वे करत असल्याची माहिती आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवास देणे आणि पूर्ण पैसे भरणाऱ्यांना योग्य सुविधा मिळवून देणे, यावर भर दिला जात आहे. RAC पद्धत रद्द केल्यास तिकीट वाटप प्रक्रियेत बदल होऊ शकतात. मात्र, यावर रेल्वेने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. सध्या हा विषय केवळ विचाराधीन आहे. त्यामुळे इथून पुढे रेल्वेत RAC तिकीट नसतील, असं आताच ठामपणे सांगता येणार नाही. रेल्वेची अधिकृत घोषणा होईपर्यंत सध्याची रिझर्व्हेशन पद्धतच सुरू राहील.

