4.49 लाख रुपयांचा आयफोन ड्युओ घेणं खरंच फायद्याचं आहे का? फोन घेण्याऐवजी हेच पैसे इंडेक्स किंवा इक्विटी फंडात गुंतवले तर किती मोठा परतावा मिळू शकतो, आणि एवढा महागडा फोन घेण्यापूर्वी तुमची आर्थिक स्थिती कशी असावी, यावर सविस्तर चर्चा करूया.

मुंबई : भारतात 4.49 लाख रुपये किंमतीचा आयफोन ड्युओ 2TB (iPhone Duo 2TB) लाँच होत असताना अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे. एवढे पैसे खर्च करून हा महागडा फोन घ्यावा की ते पैसे कुठेतरी गुंतवावे? आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आपण फक्त फोनची किंमत पाहू नये. त्याऐवजी, तेच पैसे दुसरीकडे गुंतवले तर किती फायदा होऊ शकतो, याचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

4.49 लाखांचा फोन घ्यावा का?

संपत्ती वाढवण्याचा विचार केल्यास, फोन घेणं ही गुंतवणूक नसून तो फक्त एक खर्च आहे. हेच पैसे तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवले, तर कालांतराने त्यात मोठी वाढ होईल. पण स्मार्टफोनची किंमत तो विकत घेतल्याच्या क्षणापासून कमी व्हायला सुरुवात होते. तरीही, ज्यांच्याकडे पुरेसा विमा, दीर्घकालीन गुंतवणूक आणि इमर्जन्सी फंड आधीच तयार आहे, त्यांनी स्वतःच्या छंदासाठी हा फोन घेतल्यास त्यात काहीच गैर नाही.

हे पैसे गुंतवले तर काय होईल?

इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यास (11% वार्षिक परतावा गृहीत धरून)

  • 10 वर्षांनंतर: सुमारे 12.7 लाख रुपये
  • 15 वर्षांनंतर: 21.5 लाख रुपये
  • 20 वर्षांनंतर: 36.2 लाख रुपये

डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडात गुंतवणूक केल्यास (13% वार्षिक परतावा गृहीत धरून)

  • 10 वर्षांनंतर: 15.25 लाख रुपये
  • 15 वर्षांनंतर: 28.1 लाख रुपये
  • 20 वर्षांनंतर: 51.8 लाख रुपये

याचाच अर्थ, फोन घेण्यासाठी तुम्ही आज जे 4.49 लाख रुपये मोजणार आहात, तेवढंच तुमचं नुकसान नाहीये. तर भविष्यात गुंतवणुकीतून जी मोठी संपत्ती उभी राहिली असती, तीही तुम्ही गमावत आहात.

फोन घेण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा

ज्यांच्याकडे भरपूर जास्तीचे पैसे आहेत, त्यांनी हा फोन घेण्याला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही तुमच्या बचतीचा मोठा हिस्सा यासाठी खर्च करत असाल, तर ते पैसे गुंतवणं जास्त शहाणपणाचं ठरेल. एवढी मोठी रक्कम खर्च करण्यापूर्वी खालील गोष्टी तुमच्याकडे आहेत का, याची खात्री करा.

  • पुढील 6 ते 8 महिन्यांच्या खर्चासाठी पुरेल एवढा इमर्जन्सी फंड.
  • हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स.
  • जास्त व्याजदर असलेलं कोणतंही कर्ज नसणं.
  • तुमचे एकूण मासिक EMI आणि इतर निश्चित खर्च तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 40-50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावेत.

थोडक्यात सांगायचं तर, तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना किंवा इमर्जन्सी फंडाला धक्का न लावता, तुमच्याकडच्या अतिरिक्त पैशातून तुम्ही आयफोन ड्युओ घेत असाल, तर तो वाईट निर्णय नाही. पण जर तुम्ही गुंतवणुकीचे किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी ठेवलेले पैसे मोडून फोन घेत असाल, तर मात्र तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.