जुना फ्लॅट खरेदी करताय? ही एक चूक पडली तर लाखोंचा फटका; आधी हे काम नक्की करून घ्या
Property Rules : रिसेल फ्लॅट खरेदी सोपी वाटली तरी मालमत्ता कर, पाणीपट्टी किंवा सोसायटी मेंटेनन्सची थकबाकी लपवून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे व्यवहारापूर्वी महापालिकेच्या करपावत्या, ‘आय-सरिता’ पोर्टलवरील माहिती तपासणे खरेदीदारांसाठी अत्यावश्यक आहे.

जुना फ्लॅट खरेदी करताय? ही एक चूक पडली तर लाखोंचा फटका
मुंबई : स्वतःचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमती पाहता अनेक जण नव्या घराऐवजी रिसेल म्हणजेच जुना फ्लॅट खरेदी करण्याचा पर्याय निवडत आहेत. तुलनेने कमी किंमत, आधीच विकसित परिसर आणि त्वरित ताबा मिळणे, ही यामागची प्रमुख कारणे आहेत. पण पुरेशी चौकशी आणि खबरदारी न घेतल्यास हाच निर्णय मोठ्या आर्थिक अडचणीत टाकू शकतो.
जुना फ्लॅट घेताना कशी होते फसवणूक?
रिसेल फ्लॅटच्या व्यवहारात महापालिकेचे कर, पाणीपट्टी, सोसायटी मेंटेनन्स शुल्क यांची थकबाकी लपवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतात. अनेकदा विक्रेता सर्व देयके भरलेली असल्याचा दावा करतो. मात्र व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फ्लॅट नव्या मालकाच्या नावावर करताना ही थकबाकी समोर येते.
महापालिका स्पष्ट नियम सांगते थकीत कर भरल्याशिवाय नावांतरण शक्य नाही. परिणामी, विक्रेत्याच्या चुकीचा किंवा फसवणुकीचा फटका थेट खरेदीदाराला बसतो आणि हजारो नाही तर लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च ओढवतो.
रिसेल फ्लॅट घेण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी?
जुना फ्लॅट खरेदी करताना खालील गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
1. महापालिकेच्या करपावत्या तपासा
मागील काही वर्षांचा मालमत्ता कर नियमित भरलेला आहे का, हे स्वतः तपासा. फक्त तोंडी आश्वासनांवर विसंबून राहू नका. शक्य असल्यास No Dues Certificate (थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र) आवर्जून मागा.
2. कायदेशीर कागदपत्रांची सखोल तपासणी करा
मूळ खरेदीखत, मागील विक्री व्यवहारांची साखळी, सोसायटीचे एनओसी, बँक कर्ज असल्यास कर्जमुक्ती प्रमाणपत्र यांची पडताळणी करा. एखादी कागदपत्रातील त्रुटी भविष्यात मोठी अडचण ठरू शकते. त्यामुळे कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच फायदेशीर ठरते.
‘आय-सरिता’ पोर्टलमुळे पारदर्शकता वाढली
रिसेल मालमत्ता व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. ‘आय-सरिता’ दस्त नोंदणी पोर्टलवर आता दस्त नोंदणी करतानाच संबंधित फ्लॅटवरील महापालिकेच्या कर थकबाकीची माहिती उपलब्ध होते. यामुळे त्या मालमत्तेवर किती कर बाकी आहे, कोणते शुल्क अपूर्ण आहे, हे व्यवहारापूर्वीच स्पष्ट होते. परिणामी, खरेदीदारांची होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात रोखता येणार आहे.
तरीही स्वतः सतर्क राहणे गरजेचे
फक्त ऑनलाइन प्रणालीवर अवलंबून न राहता खरेदीदारांनी स्वतःही दक्ष राहावे.
सोसायटीकडे थकीत मेंटेनन्स आहे का?
पाणी किंवा वीज बिल बाकी आहे का?
फ्लॅटवर कोणतीही नोटीस, तारण किंवा कायदेशीर वाद नाही ना?
याची खात्री करूनच पुढील पाऊल उचलावे.
घाई नको, चौकशी आवश्यक
रिसेल फ्लॅट स्वस्त वाटतो म्हणून घाईघाईने निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. थोडी काळजी, योग्य तपासणी आणि सर्व कागदपत्रांची खातरजमा केली, तर तुमचे स्वप्नातील घर सुरक्षितपणे तुमच्या हक्काचे होऊ शकते. अन्यथा, एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्यभराची कमाई वाया जाण्याची वेळ येऊ शकते, हे लक्षात ठेवा.

