Old Bank Account : २ वर्षे बँक खातं वापरलं नाही? मग तुमच्या पैशांचं काय होतं?
Old Bank Account: नोकरी बदलल्यामुळे किंवा नवीन बँकेत खातं उघडल्यामुळे अनेक जण आपलं जुनं बँक खातं वापरणं सोडून देतात. पण, त्या खात्यात पडून असलेल्या पैशांचं नेमकं काय होतं, हे तुम्हाला माहितीये का?

निष्क्रिय बँक खात्याचं काय होतं?
बँकेत बचत किंवा चालू खातं उघडल्यानंतर अनेकदा आपण ते वापरणं सोडून देतो. नोकरी बदलणं, नवीन खातं उघडणं किंवा जुन्या खात्याचे तपशील विसरणं ही यामागची कारणं असू शकतात. पण, खात्यातले पैसे आपोआप गायब होत नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार, ग्राहकाने सलग दोन वर्षे कोणताही व्यवहार न केल्यास ते खातं 'निष्क्रिय' (Inoperative) ठरवलं जातं. ग्राहकाने स्वतः केलेले किंवा त्याच्या वतीने इतरांनी केलेले व्यवहार यात ग्राह्य धरले जातात. पण, बँकेने दिलेले व्याज किंवा कापलेले सेवा शुल्क हा ग्राहकाचा व्यवहार मानला जात नाही. त्यामुळे फक्त व्याज जमा होत असल्यामुळे खातं सक्रिय राहत नाही. तुमच्या खात्याची स्थिती जाणून घेण्यासाठी थेट बँकेशी संपर्क साधणं केव्हाही चांगलं.

निष्क्रिय खातं पुन्हा कसं सुरू करायचं?
तुम्हाला तुमचं जुनं बँक खातं पुन्हा वापरायचं असेल, तर आधी बँकेत जाऊन खात्याची सध्याची स्थिती तपासा. त्यानंतर KYC (नो युवर कस्टमर) तपशील अपडेट करून तुम्ही खातं पुन्हा सुरू करण्याची विनंती करू शकता. यासाठी बँक ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा मागू शकते. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकांनी त्यांच्या सर्व शाखांमध्ये KYC अपडेटची सुविधा देणं बंधनकारक आहे. जिथे शक्य असेल तिथे व्हिडिओ KYC चा पर्यायही वापरता येतो. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तीन कामकाजाच्या दिवसांत खातं पुन्हा सुरू करणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे, यासाठी बँक ग्राहकाकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू शकत नाही.
१० वर्षे खातं न वापरल्यास पैसे बुडतात का?
बँक खात्यात किंवा ठेवीमध्ये सलग दहा वर्षे पैशांवर कोणीही दावा न केल्यास, बँक ती रक्कम 'डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड' (DEA Fund) मध्ये ट्रान्सफर करते. या फंडाचं व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते. पण, पैसे या फंडात गेले म्हणजे तुमचा हक्क संपला असं अजिबात नाही. मूळ खातेदार किंवा खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास त्याचा कायदेशीर वारसदार योग्य कागदपत्रांसह बँकेकडे पैशांची मागणी करू शकतो. बँक कागदपत्रांची पडताळणी करून नियमांनुसार रक्कम परत करते. पात्र ठेवींवर नियमानुसार व्याजही दिलं जातं. हे पैसे परत मिळवण्यासाठी थेट RBI कडे जाण्याची गरज नाही, तर ज्या बँकेत खातं होतं तिथेच संपर्क साधावा लागतो.
जुन्या खात्यात पैसे आहेत की नाही, हे कसं शोधायचं?
तुम्हाला जुन्या बँक खात्याचे तपशील आठवत नसतील, तर RBI चं UDGAM पोर्टल तुमच्या मदतीला येऊ शकतं. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, तुम्ही खातेदाराचं नाव, बँकेचं नाव, जन्मतारीख किंवा इतर ओळखपत्रांच्या मदतीने दावा न केलेल्या ठेवींची माहिती शोधू शकता. पण, हे पोर्टल थेट पैसे देत नाही. तुमचे पैसे कोणत्या बँकेत आहेत, हे शोधण्यासाठीच याचा उपयोग होतो. सध्या या पोर्टलवर सहभागी असलेल्या बँकांचीच माहिती मिळते. माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. अनेक बँकांच्या अधिकृत वेबसाईटवरही दावा न केलेल्या ठेवी शोधण्याची सुविधा उपलब्ध असते.
बँक खात्यावर लक्ष ठेवणं का गरजेचं आहे?
ज्यांचे जुन्या बँक खात्यात पैसे आहेत, त्यांनी वेळोवेळी खात्याची स्थिती तपासणं फायद्याचं ठरतं. खातं पुन्हा वापरायचं असल्यास KYC अपडेट करून ते सक्रिय करता येतं. माहिती नसेल तर UDGAM पोर्टलचा वापर करा. खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास वारसदार योग्य कागदपत्रे देऊन पैसे मिळवू शकतात. दोन वर्षे व्यवहार न केल्यास खातं निष्क्रिय होतं आणि दहा वर्षे दावा न केल्यास पैसे RBI च्या फंडात जातात. पण या दोन्ही स्थितीत पैसे परत मिळवण्याची कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध आहे. त्यामुळे जुनं खातं विसरलात म्हणजे पैसे बुडाले, असा विचार करू नका. योग्य बँकेत जाऊन अधिकृत प्रक्रिया पूर्ण केल्यास तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळतात.

