PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद होणार?
PM Kisan Yojana: केंद्र, राज्य सरकार PM किसान, नमो शेतकरी योजनेतून दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शिधापत्रिका डेटाच्या आधारे पती-पत्नी दोघांनाही लाभ मिळत असलेल्यांची ओळख पटवली जात असून एका सदस्याचा हप्ता थांबवला जाईल.

दुहेरी लाभ घेणाऱ्यांचा हप्ता थांबणार
मुंबई: केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Yojana) आणि राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’तून एकाच कुटुंबाने दुहेरी लाभ घेतल्याच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही योजना अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असल्या तरी, काही कुटुंबांनी जाणूनबुजून किंवा चुकीने दोन्ही योजनांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
कोण पात्र आणि कोण अपात्र?
‘PM Kisan’ योजनेनुसार, दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच पती-पत्नी दोघांची स्वतंत्र जमीन असली तरी त्यांना वेगवेगळा हप्ता मिळू शकत नाही. मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये दोघांनी स्वतंत्र अर्ज भरून दोन्ही योजनांतून निधी घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
दुहेरी लाभधारकांची ओळख सुरु
केंद्र सरकारने या गोंधळावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन पडताळणी यंत्रणा तयार केली आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधापत्रिकांतील माहिती आणि PM Kisan डेटाबेस यांची तुलना केली जात आहे.
शिधापत्रिकांमधील पती-पत्नीची एकत्र नोंद पाहून, दुहेरी लाभ घेणाऱ्यांची ओळख पटविणे सुलभ झाले आहे.
या प्रक्रियेनंतर अशा कुटुंबांमधील एका सदस्याचा हप्ता कायमचा थांबविण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. तसेच, त्या व्यक्तीला ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’मधूनही वगळले जाईल.
निर्णय कधी होणार?
केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही, परंतु अंतर्गत तपासणी अंतिम टप्प्यात आहे. एका वरिष्ठ कृषी अधिकाऱ्याने सांगितले की, “राज्यात हजारो कुटुंबे दुहेरी लाभ घेत असावीत. मात्र, नेमकी संख्या आणि पुढील कारवाईबाबत केंद्र सरकारकडून अजून स्पष्ट आदेश आलेले नाहीत.” काही माध्यमांमध्ये ५० हजार शेतकऱ्यांचे हप्ते रोखल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी, अधिकृतरीत्या निधी थांबविण्यात आलेला नाही.
२१ वा हप्ता आणि नवे नियम
‘PM Kisan’ योजनेचा २१वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारकडून नवीन पडताळणी नियम आणि आदेश जारी होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमांनुसार, एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला हप्ता दिला जाईल.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठा परिणाम
महाराष्ट्रात लाखो शेतकरी दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत. जर केंद्र सरकारने दुहेरी लाभधारकांची नावे यादीतून वगळली, तर राज्यातील हजारो कुटुंबांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकरी कल्याणात पारदर्शकता आणणारा ठरू शकतो. पण अनेकांसाठी तो मोठा धक्का देखील ठरण्याची शक्यता आहे.

