Nirmala Sitharaman AI Fake Video : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात २२ हजार गुंतवून दरमहा ३० लाख कमावण्याचं आमिष दाखवलं जातंय. हा व्हिडीओ AI ने तयार केलेला असून पूर्णपणे बनावट असल्याचं PIB ने स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर खूप फिरतोय. फक्त २२,००० रुपये गुंतवा आणि दर महिन्याला ३० लाख रुपये कमवा, असं या व्हिडीओत सांगितलं जातंय. पण थांबा! केंद्र सरकारची फॅक्ट-चेक करणारी संस्था 'पीआयबी फॅक्ट चेक'ने (PIB Fact Check) हा व्हिडीओ पूर्णपणे बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. फेसबुकवर या व्हिडिओची स्पॉन्सर्ड जाहिरातदेखील फिरवली जात आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन किंवा केंद्र सरकारने अशी कोणतीही गुंतवणूक योजना किंवा प्लॅटफॉर्म जाहीर केलेला नाही.
AI चा वापर करून प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने खोटे व्हिडीओ बनवायचे आणि लोकांना भरमसाठ नफ्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे, ही फसवणूक करणाऱ्यांची नवी पद्धत आहे. अशा खोट्या आमिषांना बळी पडू नका. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा तुमची वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती शेअर करण्यापूर्वी, अधिकृत स्रोतांकडून माहितीची खात्री करून घ्या, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


