नवीन वर्षात घर घेताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास आयुष्यभराची पुंजी मातीमोल होईल!
Home Loan Guide : पगारदार वर्गासाठी घर खरेदी हा एक मोठा आर्थिक निर्णय असतो, जो घाईत घेतल्यास अडचणी निर्माण करू शकतो. या लेखात गृहकर्ज, डाउन पेमेंट, अतिरिक्त खर्च जसे की मुद्रांक शुल्क आणि उत्पन्नानुसार घर निवडण्याचे महत्त्व यावर भर दिला आहे.

नवीन वर्षात घर घेताय?
मुंबई : स्वतःचे घर असावे, हे स्वप्न जवळपास प्रत्येकाच्या मनात असते. विशेषतः नोकरी करणाऱ्या पगारदार वर्गासाठी घर खरेदी हा आयुष्यातील सर्वात मोठा आणि निर्णायक आर्थिक टप्पा मानला जातो. वर्षानुवर्षांची बचत, दीर्घकाळ चालणारे गृहकर्ज आणि भविष्यातील जबाबदाऱ्या यांचा विचार करूनच हा निर्णय घ्यावा लागतो. मात्र अनेक वेळा भावनिक निर्णय, समाजाचा दबाव किंवा “आताच घर घ्यायलाच हवं” या विचारामुळे लोक घाई करतात. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, योग्य नियोजन आणि आर्थिक स्थैर्य नसताना घेतलेला घर खरेदीचा निर्णय पुढे गंभीर अडचणी निर्माण करू शकतो.
घर खरेदीपूर्वी काय काळजी घ्यावी?
बहुतेक वेळा घर खरेदीसाठी गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. सामान्यतः बँका किंवा वित्तसंस्था घराच्या किमतीच्या सुमारे 80 टक्क्यांपर्यंत कर्ज मंजूर करतात, तर उर्वरित 20 टक्के रक्कम डाउन पेमेंट म्हणून स्वतः भरावी लागते. त्यामुळे नोकरीच्या सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध बचत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, घर खरेदीचा निर्णय अचानक न घेता किमान काही वर्षांची आर्थिक तयारी असणे आवश्यक आहे. नियमित बचत, स्थिर उत्पन्न आणि भविष्यातील खर्चाचा अंदाज घेतल्याशिवाय पुढचे पाऊल उचलू नये.
प्रत्येक टप्प्यावर घर घेणं योग्यच असेल असं नाही
पगारदार व्यक्तीच्या आयुष्यात काही टप्पे असे असतात, ज्या वेळी घर खरेदी पुढे ढकलणंच जास्त शहाणपणाचं ठरतं. उदाहरणार्थ, जर आधीच वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी मोठ्या प्रमाणात असेल, तर त्यावर गृहकर्जाचा अतिरिक्त बोजा उचलणे धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत आधी जुनी कर्जे फेडून आर्थिक स्थैर्य मिळवणे अधिक महत्त्वाचे ठरते.
उत्पन्नापेक्षा महाग घर घेऊ नका
फक्त आवड म्हणून किंवा “स्वप्नातलं घर” मिळतंय म्हणून आपल्या उत्पन्नाच्या क्षमतेपेक्षा महाग घर खरेदी करणं टाळा. जास्त EMI मुळे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. परिणामी, दैनंदिन खर्च, बचत आणि भविष्यातील गरजांसाठी पैसे उरणार नाहीत. तसेच, जर तुमच्याकडे आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार नसेल, तर घर खरेदीचा निर्णय घाईचा ठरू शकतो.
घराची किंमत म्हणजेच एकूण खर्च नाही
अनेक जण फक्त घराच्या किमतीकडे लक्ष देतात; मात्र प्रत्यक्षात खर्च इथेच संपत नाही. घर खरेदी करताना खालील अतिरिक्त खर्चही लक्षात घ्यावे लागतात.
मुद्रांक शुल्क (Stamp Duty)
नोंदणी शुल्क
इंटिरियर आणि फर्निचर
घर बदलताना होणारा शिफ्टिंग खर्च
या सर्व गोष्टींसाठी मोठी रक्कम खर्चावी लागते. त्यामुळे संपूर्ण खर्चाचा विचार करूनच आर्थिक आराखडा तयार करणे अत्यावश्यक आहे. जर हे खर्च लगेच परवडणारे नसतील, तर आधी त्यासाठी स्वतंत्र बचत करणेच योग्य ठरेल.
घराच्या किमती शहरानुसार बदलतात
घर खरेदीसाठी लागणारी रक्कम घराचे स्थान, परिसर, शहर आणि आकार यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. उदाहरणार्थ, मुंबईसारख्या महानगरात साध्या 1 BHK घरासाठीही कोट्यवधी रुपये खर्च येऊ शकतो, तर 3 ते 5 BHK घरांसाठी दोन ते चार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बजेट लागते.
त्याउलट, इतर शहरांमध्ये किंवा उपनगरांमध्ये तुलनेने कमी बजेटमध्ये घर मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या उत्पन्नानुसार आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे अत्यंत गरजेचे आहे.

