NDMA आणि दूरसंचार विभागाने ‘सेल ब्रॉडकास्ट’ तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान अँड्रॉइड आणि आयओएस फोनवर बीपसह अलर्ट मेसेज पाठवण्यात आला.

शुक्रवारी दुपारी अनेक नागरिकांच्या स्मार्टफोनवर अचानक मोठ्या आवाजात बीप किंवा कंपनासह एक संदेश आला आणि काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र हा कोणताही धोका नसून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) आणि दूरसंचार विभागाने आपत्कालीन सूचना प्रणालीची घेतलेली अधिकृत चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सेल ब्रॉडकास्ट प्रणालीची थेट चाचणी

National Disaster Management Authority आणि Department of Telecommunications यांनी २० फेब्रुवारी रोजी दुपारी आपत्कालीन सूचना प्रणालीची थेट चाचणी घेतली. या अंतर्गत अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनवर मोठ्या आवाजासह बीप किंवा कंपन निर्माण करणारा संदेश प्रसारित करण्यात आला. ही प्रणाली Centre for Development of Telematics यांनी विकसित केली आहे. नैसर्गिक आपत्ती, हवामान इशारे, चक्रीवादळ किंवा इतर गंभीर परिस्थितींमध्ये विविध भारतीय भाषांमध्ये एसएमएस अलर्ट देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

अलर्ट मेसेजमध्ये काय सांगितले होते?

अलर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, हा एक चाचणी सेल प्रसारण संदेश आहे जो NDMA आणि DOT यांच्या समन्वयाने पाठवण्यात आला आहे. तसेच, चाचणीदरम्यान हा संदेश अनेक वेळा प्राप्त होऊ शकतो. नागरिकांनी या संदेशाकडे दुर्लक्ष करावे आणि कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

चाचणी संदेश का पाठवले जातात?

सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टमचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीत रिअल-टाइम सूचना देणे हा आहे. भूकंप, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ यांसारख्या मोठ्या संकटांबाबत नागरिकांना त्वरित सतर्क करण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून, विशिष्ट भूभागातील नागरिकांच्या मोबाईलवर थेट एसएमएसद्वारे सूचना पाठवते.

साध्या मेसेजपेक्षा वेगळी कशी?

साध्या मजकूर संदेशांपेक्षा सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान अधिक प्रभावी आहे. हे एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर एकाच वेळी पाठवता येते. त्यामुळे दूरसंचार नेटवर्कवर अतिरिक्त ताण न येता मोठ्या प्रमाणात आणि जलद सूचना पोहोचवणे शक्य होते.