जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओमध्ये एलआयसी (LIC) सर्वात मोठी अँकर इन्व्हेस्टर ठरली आहे. एलआयसीने जवळपास ५०० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
मुंबई : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या आयपीओमध्ये (IPO) भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे. एक्सचेंज फायलिंगनुसार, एलआयसीला १,११९ रुपये प्रति शेअर या दराने जवळपास ५०० कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात आले आहेत.
जिओ प्लॅटफॉर्म्सचा एकूण आयपीओ ३०,१८८ कोटी रुपयांचा आहे. या आयपीओपूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून ८,११० कोटी रुपये उभे केले आहेत. यामध्ये जगातील बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसह सॉव्हरिन वेल्थ फंड, विमा कंपन्या आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडांनीही पैसे लावले आहेत.
अँकर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप
कंपनीच्या आयपीओ समितीने बुक-रनिंग लीड मॅनेजर्ससोबत चर्चा करून अँकर गुंतवणूकदारांना ७,२४,७४,०६६ इक्विटी शेअर्स देण्याचा निर्णय पक्का केला. हे शेअर्स १,११९ रुपये प्रति शेअर या दराने दिले गेले आहेत.या संपूर्ण वाटपाची किंमत जवळपास ८,१०९.८५ कोटी रुपये इतकी होते. फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, १० रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या या शेअरवर १,१०९ रुपयांचा सिक्युरिटीज प्रीमियम आकारण्यात आला आहे. सर्व अँकर गुंतवणूकदारांना १,११९ रुपये या एकाच समान दराने शेअर्स देण्यात आले आहेत, असे फायलिंगमध्ये म्हटले आहे.
प्रमुख गुंतवणूकदार कोण?
यामध्ये एलआयसीला ४४,६८,१२८ इक्विटी शेअर्स मिळाले आहेत. याची एकूण किंमत ४९९.९८ कोटी रुपये असून, अँकर गुंतवणूकदारांच्या कोट्यातील हा ६.१७ टक्के वाटा आहे.न्यू वर्ल्ड फंड इंकला (New World Fund Inc) सुमारे ४८६.२७ कोटी रुपयांचे शेअर्स मिळाले आहेत. तर, सिंगापूर सरकारला जवळपास ३४०.९३ कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात आले आहेत.
बीएनपी पारिबा फायनान्शियल मार्केट्सनेही (BNP Paribas Financial Markets) यात मोठी गुंतवणूक केली असून त्यांना ३०३.२५ कोटी रुपयांचे शेअर्स मिळाले आहेत.या अँकर बुकमध्ये कॅपिटल ग्रुप, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, ब्लॅकरॉक, जेपी मॉर्गन ॲसेट मॅनेजमेंट आणि श्रोडर्स यांसारख्या जागतिक गुंतवणूक संस्थांनीही सहभाग नोंदवला. याशिवाय अबू धाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी आणि कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी यांसारख्या सॉव्हरिन गुंतवणूकदारांनीही पैसे गुंतवले आहेत.
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये विविध म्युच्युअल फंड योजना आणि विम्याशी संबंधित गुंतवणूक संस्थांचा समावेश आहे.अनेक ॲसेट मॅनेजर्सनी वेगवेगळ्या फंड आणि योजनांच्या माध्यमातून यात सहभाग घेतला आहे. याची सविस्तर यादी एक्सचेंजला दिलेल्या माहितीत वेगळी देण्यात आली आहे.
आयपीओचे महत्त्वाचे तपशील
सर्वसामान्यांसाठी हा आयपीओ बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी खुला होईल आणि शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल. या आयपीओसाठी १,०६५ ते १,११९ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.








