वेळ वाचवण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी दोन-तीन दिवसांचा स्वयंपाक एकदाच करून फ्रिजमध्ये ठेवतात. याला आजकाल 'मील प्रेप' (Meal Prep) असं फॅशनेबल नाव आहे.
वेळ वाचवण्यासाठी अनेकजण सुट्टीच्या दिवशी दोन दिवसांचा स्वयंपाक एकदम करून फ्रिजमध्ये ठेवतात. रोज फक्त आयतं जेवण गरम करून खायचं. याला आता 'मील प्रेप' (Meal Prep) असं म्हणतात. हे खूप सोयीचं आहे, पण प्रश्न एकच - असं केल्याने अन्नातील पोषक घटक टिकून राहतात का? की आपण नकळतपणे शरीरात विष ढकलत आहोत? पोषण तज्ज्ञांच्या मते, शिजवलेलं अन्न फ्रिजमध्ये ४ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात ३ ते ४ दिवसांपर्यंत खाण्यासाठी सुरक्षित असू शकतं. पण हे पूर्णपणे पदार्थाच्या प्रकारावर अवलंबून आहे. साधारणपणे भात, डाळ, भाजी, माशांचं कालवण २ दिवसांपर्यंत चांगलं राहतं. चिकन किंवा अंड्याची करी ३ दिवसांपर्यंत खाऊ शकता. पण उकडलेला बटाटा, पनीर किंवा दुधाचे पदार्थ १-२ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नयेत.
आता बोलूया पोषणाबद्दल. हो, पोषक घटक कमी होतात, पण पूर्णपणे नष्ट होत नाहीत. शिजवलेलं अन्न तुम्ही जितक्या वेळा गरम कराल, तितक्या वेळा त्यातील व्हिटॅमिन सी, बी१२ आणि फोलेटसारखे घटक नष्ट होतात. विशेषतः पालेभाज्या दोन दिवसांनंतर त्यांचे ३० ते ४० टक्के व्हिटॅमिन्स गमावतात. मात्र, भात, डाळ, मांसातील प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स दोन दिवसांनीही जवळपास सारखेच राहतात, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यात अडचण येत नाही.
पोषणापेक्षाही मोठी भीती आहे बॅक्टेरियाची. शिजवलेलं अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिल्यास त्यात बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. फ्रिजमध्ये ठेवूनही जर तुम्ही ते नीट गरम केलं नाही, तर फूड पॉयझनिंग, डायरिया किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे जर तुम्हाला दोन दिवसांचं अन्न साठवायचंच असेल, तर काही नियम पाळावे लागतील. पहिला नियम आहे 'दोन तासांचा नियम'. स्वयंपाक झाल्यावर दोन तासांच्या आत अन्न थंड करून हवाबंद डब्यात (airtight container) भरून फ्रिजमध्ये ठेवा. गरम अन्न कधीही थेट फ्रिजमध्ये ठेवू नका. दुसरं म्हणजे, एकाच मोठ्या भांड्यात ठेवण्याऐवजी छोट्या-छोट्या डब्यांमध्ये विभागून ठेवा. यामुळे प्रत्येक वेळी सगळं अन्न गरम करावं लागणार नाही. तिसरं, जेवढं खायचं आहे, तेवढंच अन्न भांड्यातून काढून एकदाच चांगलं उकळून गरम करा. वारंवार गरम-थंड केल्याने बॅक्टेरिया जास्त वाढतात.
काही पदार्थ तर असे आहेत जे दोन दिवस अजिबात ठेवू नयेत. जसं की, उकडलेला बटाटा, भातामध्ये कांदा मिसळलेले पदार्थ, पालक, चिकन सॅलड. हे पदार्थ एका दिवसापेक्षा जास्त ठेवल्यास त्यातील नायट्रेटचं रूपांतर विषारी घटकांमध्ये होऊ शकतं. थोडक्यात काय, तर दोन दिवसांचं अन्न फ्रिजमध्ये ठेवायला हरकत नाही, पण ताज्या जेवणासारखं पोषण त्यात कधीच मिळणार नाही. शक्यतो एका दिवसापेक्षा जास्त शिळं अन्न ठेवू नका, हेच उत्तम.
