- Home
- Utility News
- Mobile Recharge : सर्वसामान्यांना पुन्हा फटका.. मोबाईल रिचार्ज किती महागणार माहितीये का?
Mobile Recharge : सर्वसामान्यांना पुन्हा फटका.. मोबाईल रिचार्ज किती महागणार माहितीये का?
मोबाईल युजर्सच्या खिशाला लवकरच पुन्हा कात्री लागण्याची शक्यता आहे. 'सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च'च्या नव्या रिपोर्टनुसार, देशातील टेलिकॉम कंपन्या येत्या ४ ते ५ महिन्यांत त्यांच्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवू शकतात.

४-५ महिन्यांत रिचार्ज महागणार?
सध्या टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीनच प्रमुख कंपन्या आहेत. बाजारात स्पर्धा कमी झाल्यामुळे या कंपन्यांना किमती वाढवणं सोपं जातंय, असं सेंट्रमच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे येत्या ४-५ महिन्यांत मोबाईल रिचार्ज १२ ते १५ टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. असं झाल्यास, कॉलिंग आणि डेटासाठी ग्राहकांना सध्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

जिओ, एअरटेल आणि Vi ग्राहकांची स्थिती
टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत 'प्रति ग्राहक सरासरी महसूल' (ARPU) असतो. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचा ARPU ०.८ ते २ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज या रिपोर्टमध्ये वर्तवलाय. लोक 2G वरून 4G आणि 5G कडे वळत आहेत, तसंच पोस्टपेड ग्राहकांची संख्या वाढतेय, हे यामागचं मुख्य कारण आहे.
जिओचे सुमारे ८ दशलक्ष नवीन ग्राहक वाढून एकूण संख्या ५४१ दशलक्षांवर पोहोचेल आणि त्यांचा ARPU २१८ रुपयांपर्यंत जाईल. एअरटेलचे ३ दशलक्ष ग्राहक वाढून एकूण संख्या ३८ दशलक्ष होईल आणि ARPU २६९ रुपये होईल. तर, व्होडाफोन आयडियाचे १ दशलक्ष ग्राहक वाढून एकूण संख्या १९४ दशलक्षांवर जाईल आणि त्यांचा ARPU १७८ रुपये होईल, असं रिपोर्ट सांगतो.
5G चा वाढता वापर
देशात 4G आणि 5G चा वापर वाढत असल्यामुळे ग्राहकांचा डेटा खर्चही वाढणार आहे. जिओ आणि एअरटेलने आधीच ९५ टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केलीय. आता या कंपन्या जास्तीत जास्त 5G डिव्हाइसेस त्यांच्या नेटवर्कला जोडण्यावर भर देत आहेत.
व्होडाफोन आयडियानेही जवळपास २०० शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून, भविष्यात ती आणखी विस्तारण्याची त्यांची योजना आहे. दुसरीकडे, जिओ आणि एअरटेलच्या 5G फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस (FWA) आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, असं रिपोर्टमध्ये नमूद केलंय.
व्होडाफोन आयडियाचा निधीवर फोकस
व्होडाफोन आयडियाला सध्या नेटवर्क विस्तार आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. यासाठी कंपनी बँकांकडून २५,००० कोटी रुपयांचं कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. २०२७ ते २०२९ या आर्थिक वर्षांदरम्यान कंपनीला सुमारे ४५,००० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करावा लागणार आहे.
या रिपोर्टमध्ये इंडस टॉवर्स आणि टाटा कम्युनिकेशन्स या कंपन्यांचाही आढावा घेतलाय. इंडस टॉवर्सच्या महसुलात तिमाही आधारावर १.७ टक्के, तर टाटा कम्युनिकेशन्सच्या महसुलात १.६ टक्के वाढ अपेक्षित आहे. एकंदरीत, टेलिकॉम कंपन्यांची कमाई आणि 5G चा वापर वाढत असला तरी, येत्या काही महिन्यांत रिचार्ज महागल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर मात्र मोठा ताण पडणार आहे.
