सणासुदीच्या काळात होंडाने आपल्या एलिव्हेट, सिटी आणि अमेज कार्सवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. या ऑफरमागे एक मोठं कारण आहे, ते म्हणजे उद्या लाँच होणारी नवी 'होंडा एलिव्हेट फेसलिफ्ट'. नव्या डिझाईन आणि पॅनोरमिक सनरूफसह येणाऱ्या या कारच्या इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सणासुदीचा काळ सुरू होताच ऑटोमोबाईल मार्केटमध्ये ऑफर्सचा पाऊस पडत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. यातच आता होंडा कार्स इंडियानेही (Honda Cars India) ग्राहकांसाठी खास ऑफर्सची घोषणा केली आहे. होंडाची मिड-साईझ एसयूव्ही 'एलिव्हेट'वर (Honda Elevate) कंपनीने तब्बल २.३४ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. या ऑफर्स ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहतील.

ऑक्टोबरमध्ये होंडा कार्सवर मिळणाऱ्या ऑफर्स

एलिव्हेटसोबतच होंडाच्या इतर मॉडेल्सवरही चांगला डिस्काउंट मिळत आहे. नव्या होंडा सिटीवर १.७० लाख रुपयांपर्यंत, नव्या अमेजवर ६६,८०० रुपयांपर्यंत आणि सेकंड जनरेशन अमेजवर ५७,६०० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

ऑक्टोबरमधील जास्तीत जास्त डिस्काउंट:

होंडा एलिव्हेट – २.३४ लाख रुपये

नवी होंडा सिटी – १.७० लाख रुपये

नवी होंडा अमेज – ६६,८०० रुपये

सेकंड जनरेशन होंडा अमेज – ५७,६०० रुपये

उद्या लाँच होणार नवी एलिव्हेट

होंडा एलिव्हेटचं नवं फेसलिफ्ट मॉडेल उद्या म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतात लाँच होणार आहे. या नव्या मॉडेलसाठी बुकिंग आधीच सुरू झाली असून, तुम्ही २१,००० रुपये देऊन ही कार बुक करू शकता. अधिकृत टीझर आणि टेस्टिंगच्या फोटोंवरून हे स्पष्ट झालंय की, नव्या एलिव्हेटच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. पण, इंजिन मात्र जुनेच असणार आहे.

एक्सटीरियरमध्ये काय बदल?

नव्या एलिव्हेटच्या पुढच्या भागात एक चमकदार हेक्सागोनल ग्रिल देण्यात आली आहे, जो यातील सर्वात मोठा बदल आहे. होंडा सिटीसारखे स्प्लिट एलईडी डीआरएल (LED DRLs) आणि नव्या डिझाईनचे कनेक्टेड एलईडी टेललाईट्स या कारमध्ये मिळतील. मात्र, हेडलाईट्स आणि फॉग लॅम्प्समध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही.

इंटिरिअरमध्ये मिळणार भन्नाट फीचर्स

२०२६ होंडा एलिव्हेट फेसलिफ्टच्या इंटिरिअरमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. नव्या डॅशबोर्डसोबतच अंबर कलरची अँबियंट लायटिंग सिस्टीम यात मिळेल. याशिवाय, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, रिअर विंडो सनब्लाइंड्स आणि इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल को-पॅसेंजर सीट असे भन्नाट फीचर्स या नव्या मॉडेलमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

इंजिनमध्ये कोणताही बदल नाही

एलिव्हेट फेसलिफ्टच्या इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात जुनेच १.५ लिटर, ४-सिलेंडर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. हे इंजिन १२१ बीएचपी (bhp) पॉवर आणि १४५ एनएम (Nm) टॉर्क जनरेट करतं. तसेच, यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड सीव्हीटी (CVT) गिअरबॉक्सचे पर्याय मिळतील.

मार्केटमध्ये तगडी स्पर्धा

मिड-साईझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये नव्या एलिव्हेटची थेट स्पर्धा किया सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा, टाटा सिएरा, मारुती व्हिक्टोरिस (Maruti Victoris), रेनॉल्ट डस्टर, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन टायगुन यांसारख्या गाड्यांशी असणार आहे. नव्या एलिव्हेटची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. सध्या एलिव्हेटची एक्स-शोरूम किंमत ११.८१ लाख ते १६.३६ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. नवं फेसलिफ्ट मॉडेल बाजारात येण्यापूर्वीच जुन्या मॉडेलवर २.३४ लाख रुपयांपर्यंतची सूट देऊन सणासुदीच्या काळात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्याचा होंडाचा हा प्लॅन आहे.