गुगल 'सेल्फी व्हिडिओ' नावाचं एक नवीन फीचर आणत आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरलात आणि रिकव्हरीचे दुसरे पर्याय नसतील, तर एका छोट्या व्हिडिओने तुमची ओळख पटेल आणि अकाउंट परत मिळेल. यात बनावट व्हिडिओ ओळखण्याची सोयही आहे.

आपल्या जीमेलचा चा पासवर्ड विसरला की मोठी पंचायत होते. त्यात रिकव्हरी फोन, कॉम्प्युटर किंवा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ॲप जवळ नसेल तर अजूनच डोक्याला ताप. पण आता गुगलने यावर एक सोपा उपाय आणला आहे. 'सेल्फी व्हिडिओ' नावाच्या या नवीन टूलमुळे तुम्ही एका छोट्या व्हिडिओने तुमची ओळख पटवून देऊ शकता.

गुगलचं म्हणणं आहे की, जेव्हा अकाउंट परत मिळवण्याचे नेहमीचे पर्याय कामी येत नाहीत, तेव्हा हे 'सेल्फी व्हिडिओ' फीचर उपयोगी पडेल. हे एक ऑप्शनल टूल आहे, म्हणजे ते वापरायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही अकाउंटमधून लॉक आऊट झालात, तर गुगल तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी एक छोटा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगू शकतं. पण हो, त्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन आधीच सेट करावं लागेल.

हे फीचर काम कसं करतं?

हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला ते तुमच्या गुगल अकाउंटमध्ये आधीच सेट करावं लागेल. सेटअप करताना, गुगल तुम्हाला एक छोटा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगेल. यात तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेऱ्याकडे पाहून काही सोप्या सूचना फॉलो कराव्या लागतील, जसं की तुमचं डोकं हलवणं किंवा चेहऱ्यावर छोटे हावभाव करणं. हा तुमचा 'रेफरन्स व्हिडिओ' म्हणून सेव्ह होईल.

एकदा का तुम्ही व्हिडिओ रेफरन्स सेट केला, की पुढच्या वेळी पासवर्ड विसरल्यावर किंवा नेहमीचे साइन-इन पर्याय वापरता न आल्यास, गुगल तुम्हाला पुन्हा एक छोटा सेल्फी व्हिडिओ काढायला सांगेल. त्यानंतर, ही सिस्टीम तुमच्या या नवीन व्हिडिओची तुलना तुमच्या अकाउंटमध्ये सेव्ह असलेल्या रेफरन्स व्हिडिओशी करेल आणि तुमची ओळख पटेल.

गुगलच्या मते, व्हिडिओ रेकॉर्ड करताना सांगितलेल्या हालचाली खूप महत्त्वाच्या आहेत. कारण यामुळे हे सिद्ध होतं की कॅमेऱ्यासमोर एक जिवंत व्यक्ती आहे, आणि कोणी तुमचा फोटो किंवा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ वापरत नाहीये.

डीपफेक व्हिडिओ सुद्धा ओळखणार

आजकाल AI च्या मदतीने बनवलेल्या डीपफेकचा धोका वाढला आहे. हे लक्षात घेऊन गुगलने आपल्या या नवीन व्हिडिओ व्हेरिफिकेशन सिस्टीममध्ये अनेक सुरक्षा स्तर टाकले आहेत. ही सिस्टीम तुमचा नवीन सेल्फी व्हिडिओ रेफरन्स व्हिडिओशी तर तपासेलच, पण त्याचबरोबर कॅमेऱ्यासमोर खरी व्यक्ती आहे की नाही हेही ओळखेल. म्हणजे कोणी बनावट फोटो, एडिट केलेले व्हिडिओ किंवा AI ने बनवलेले चेहरे वापरत असेल, तर ते लगेच पकडलं जाईल.

कंपनीचं म्हणणं आहे की, त्यांनी सेल्फी व्हेरिफिकेशनला त्यांच्या सध्याच्या सुरक्षा प्रणालींशी जोडलं आहे. यामध्ये व्यक्तीचं डिव्हाइस, ब्राउझर सेटिंग्ज, आयपी ॲड्रेस, लोकेशन आणि साइन-इन करण्याचा प्रयत्न नेहमीपेक्षा वेगळा आहे का, यांसारख्या गोष्टी तपासल्या जातात. हे 'सेल्फी व्हिडिओ' फीचर जगभरातील गुगल अकाउंट युजर्ससाठी हळूहळू रोलआऊट केलं जात आहे.