भारतात ओटीटी क्रांतीची सुरुवात नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईमने केलेली नाही. २००८ मध्येच रिलायन्स एंटरटेनमेंटच्या 'बिगफ्लिक्स'ने ऑनलाईन सिनेमा स्ट्रीमिंगचा पाया रचला होता.

नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम भारतात येण्यापूर्वीच ऑनलाईन सिनेमे बघण्याचा प्रयोग आपल्याकडे सुरू झाला होता. भारतात ओटीटीसारख्या डिजिटल स्ट्रीमिंगची सुरुवात नेमकी कोणत्या कंपनीने केली, हे तुम्हाला माहितीये का? नाव ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल!

एक काळ असा होता जेव्हा सिनेमा बघायचा असेल तर थेट थिएटर गाठावं लागायचं. किंवा मग तो टीव्हीवर येईपर्यंत वाट पाहावी लागायची. पण आता काळ बदललाय. हातातला स्मार्टफोन किंवा घरातला स्मार्ट टीव्ही चालू केला की, आवडीचा सिनेमा कधीही आणि कुठेही बघता येतो.

आज नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, अहा (Aha) आणि जिओ हॉटस्टार यांसारखे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आपल्या रोजच्या मनोरंजनाचा भाग बनलेत. थिएटरमध्ये रिलीज झालेले सिनेमे काही आठवड्यांतच ओटीटीवर येतात. सिनेमांसोबतच वेब सिरीज, डॉक्युमेंट्री आणि ओरिजिनल कंटेंटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

पण एवढ्या लोकप्रिय झालेल्या या ओटीटी विश्वाची भारतात सुरुवात कधी झाली? नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमच्या आधी भारतीय प्रेक्षकांना ऑनलाईन सिनेमा बघण्याचा अनुभव कोणत्या कंपनीने दिला, याची उत्सुकता आता वाढली असेल.

२००८ मध्येच सुरू झाला होता डिजिटल सिनेमाचा प्रयोग!

भारतात डिजिटल व्हिडिओ मार्केट वाढण्यापूर्वीच काही कंपन्यांनी ऑनलाईन सिनेमे पोहोचवण्याचा प्रयोग सुरू केला होता. यात सर्वात प्रमुख नाव येतं ते 'रिलायन्स एंटरटेनमेंट'चं.

२००८ मध्ये रिलायन्स एंटरटेनमेंटने 'बिगफ्लिक्स' (BIGFLIX) नावाने व्हिडिओ ऑन डिमांड सेवा सुरू केली. आजच्या भाषेत सांगायचं तर हा पूर्णपणे ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हता. पण इंटरनेटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सिनेमे पोहोचवण्याचा हा प्रयत्न भारताच्या डिजिटल एंटरटेनमेंट क्षेत्रातली एक मोठी सुरुवात होती.

आज ओटीटी म्हटलं की साहजिकच नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईमचं नाव डोळ्यांसमोर येतं. पण हे प्लॅटफॉर्म्स भारतात लोकप्रिय होण्यापूर्वीच बिगफ्लिक्सने भारतीय प्रेक्षकांना डिजिटल माध्यमातून सिनेमा बघण्याची संकल्पना ओळख करून दिली होती.

कन्नड, हिंदीसह अनेक भाषांतील सिनेमांवर भर

इंटरनेटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सिनेमे पोहोचवणं, हा बिगफ्लिक्सचा मुख्य उद्देश होता. हिंदीसोबतच तेलुगू आणि कन्नडसारख्या अनेक भारतीय भाषांमधले सिनेमे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण तो काळ आजच्यासारखा नव्हता. २००८ ते २०१२ या काळात भारतात इंटरनेटचा वापर आजच्यासारखा सर्रास होत नव्हता. अनेक ठिकाणी फक्त 2G नेटवर्क असायचं. 3G सुद्धा सगळ्यांना सहज मिळत नव्हतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोबाईल डेटा खूप महाग होता.

आजच्यासारखे काहीशे रुपयांत भरपूर डेटा किंवा अनलिमिटेड डेटा पॅक तेव्हा नव्हते. इंटरनेटचा स्पीडही खूप कमी असायचा. त्यामुळे ऑनलाईन एखादा सिनेमा बघणं हे मोठं आव्हान होतं. व्हिडिओ प्ले केला की आधी बफर होणार. थोडा वेळ चालल्यावर पुन्हा थांबणार. पुन्हा लोड होणार. त्यातल्या त्यात HD कंटेंट ऑनलाईन स्ट्रीम करणं, त्यावेळच्या नेटवर्कच्या परिस्थितीत अजिबात सोपं नव्हतं.

ओटीटीच्या वाढीला इंटरनेट क्रांतीच कारणीभूत!

आजच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससारख्या मोठ्या बजेटच्या ओरिजिनल वेब सिरीज, शोज किंवा एक्सक्लुझिव्ह कंटेंट त्या काळात नव्हता. त्यामुळे बिगफ्लिक्ससारख्या सुरुवातीच्या डिजिटल स्ट्रीमिंगच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

पण त्यानंतर भारतात इंटरनेटचा वापर वेगाने वाढला. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली. स्वस्त डेटा पॅक मिळू लागले. इंटरनेटचा स्पीडही सुधारला. याचा परिणाम म्हणून भारतातील ओटीटी क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली. एकापाठोपाठ एक अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स मार्केटमध्ये आले. आज सिनेमांपासून ते वेब सिरीजपर्यंत सगळंच घरबसल्या बघता येईल, इतकं हे ओटीटी मनोरंजनाचं जग विस्तारलं आहे.

त्यामुळे, आज आपण नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओसारख्या अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चर्चा करत असलो तरी, भारतात इंटरनेटवरून सिनेमा बघण्याचा प्रयोग खूप आधीच सुरू झाला होता, ही गोष्ट नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे.