सोने तसंच चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सोने-चांदीचा दर मागील काही दिवस सतत घसरत होता. काही दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा वाढला आहे.
मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सतत घसरण होत होती. आज मात्र सोने-चांदी दरातील घसरण थांबली आहे. दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर वाढ झाली आहे. आज सराफा बाजार सुरू झाल्यापासून पहिल्या तीन तासात सोने दरात ७०० रुपयांची वाढ पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात २८०० रुपयांची वाढ झाली. नंतर ही वाढ पुन्हा कमी देखील झाली.

आज गुरुवारी २५ जून रोजी सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १७४ रुपयांनी वाढला. त्यामुळे सोन्याचा एक तोळ्यासाठीचा आजचा भाव १,४१,४४४ रुपये इतका आहे. तर चांदीच्या दरात ४२५ रुपये प्रति किलो वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव २,१३,५०० रुपये प्रति किलो इतका आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,४०,१३० इतका आहे. २२ कॅरेटसाठी १,२८,४५० रुपये इतकी किमत मोजावी लागेल. तर १८ कॅरेटचा भाव १०५१०० इतका आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारीही सोने दरात घसरण झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांत सोने दरात ६००० रुपयांची घसरण झाली होती. तर चांदीचा भावही उतरला होता. चांदीच्या दरात १५००० हून अधिक घसरण झाली होती.
डॉलरचा वाढता भाव आणि दुसरीकडे बँकांकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता या दोन गोष्टींमुळे सोने-चांदीच्या दरात मोठे बदल, चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
मागील काही दिवसांपासून डॉलरच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. या आठवड्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत अर्थात सलग तीन दिवस बुधवारपर्यंत या डॉलर निर्देशांकात वाढ होत होती. डॉलर १३ महिन्यांच्या उच्चांकावर होता. मात्र गुरुवारी डॉलरच्या निर्देशांकात काहीशी घट झाली. आधी डॉलर मजबूत झाल्याने सोनं खरेदी करणं अधिक महाग होतं. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होते. त्यामुळेच सोन्याचे भाव कमी होत असल्याची माहिती मार्केट एक्सपर्ट देतात.

