आजच्या काळात नोकरी कधीही जाऊ शकते. अशा परिस्थितीत उत्पन्न थांबलं तरी घरभाडं, लोनचा EMI यांसारखे खर्च थांबत नाहीत. यासाठी एक इमर्जन्सी फंड तयार करणं गरजेचं आहे. तसेच, नवीन कर्ज घेतानाही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी.

मुंबई: पूर्वी कसं होतं, फक्त तात्पुरत्या किंवा कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच नोकरी जाण्याची भीती असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीवर ही वेळ येऊ शकते. कंपनीच्या अंतर्गत बदलांमुळे, एखादा प्रोजेक्ट संपल्यामुळे किंवा कंपनीला तोटा झाल्यामुळे नोकरी जाऊ शकते. उत्पन्न थांबलं तरी आपले दैनंदिन खर्च थांबत नाहीत, नाही का? घरभाडं, कर्जाचे हप्ते (EMI), किराणा सामान, मुलांची शाळेची फी, इन्शुरन्सचा प्रीमियम हे सगळं वेळेवर भरावंच लागतं. आपण आपली नोकरी कायमस्वरूपी सुरक्षित नाही करू शकत, पण उत्पन्न नसलेल्या काळासाठी आर्थिक तयारी नक्कीच करू शकतो.

तुमचे मूलभूत खर्च नक्की किती आहेत?

गुंतवणुकीचा विचार करण्यापूर्वी, घर चालवण्यासाठी दर महिन्याला कमीत कमी किती पैसे लागतात याचा हिशोब करा. घरभाडं किंवा होम लोनचा EMI, किराणा, लाईट बिलसारखी युटिलिटी बिलं, मुलांची फी, इन्शुरन्स, औषधं आणि प्रवासाचा खर्च यांसारख्या अत्यावश्यक गोष्टींना प्राधान्य द्या. यातून तुम्हाला महिनाभर जगण्यासाठी लागणारी किमान रक्कम कळेल. अचानक नोकरी गेल्यास, नवीन नोकरी मिळेपर्यंत तुम्हाला तुमच्या बचतीतून किती पैसे लागतील याचा एक अंदाज येईल.

इमर्जन्सी फंड तयार ठेवा

ज्यांचे उत्पन्न स्थिर आहे, त्यांच्यासाठी छोटा इमर्जन्सी फंड पुरेसा असतो. पण तुमच्या नोकरीत अनिश्चितता असेल, तर थोडी मोठी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवणं शहाणपणाचं आहे. किमान सहा महिन्यांच्या खर्चाची रक्कम बाजूला ठेवा. जर तुम्ही शॉर्ट-टर्म कॉन्ट्रॅक्टवर काम करत असाल, घरात कमावणारे एकटेच असाल किंवा नवीन नोकरी शोधायला वेळ लागेल असं वाटत असेल, तर ९ ते १२ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम इमर्जन्सी फंडमध्ये असणं चांगलं. ही रक्कम सेव्हिंग्ज अकाउंट किंवा सहज मोडता येणाऱ्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FD) ठेवावी, जेणेकरून गरज लागल्यास लगेच काढता येईल. या फंडाचा मुख्य उद्देश जास्त व्याज मिळवणं नाही, तर पगार थांबल्यावर बिलं वेळेवर भरणं हा आहे.

नवीन कर्ज घेताना सावधान!

नवीन कर्ज घेताना विशेष काळजी घ्या. जर तुमच्या पगाराचा मोठा हिस्सा EMI मध्ये जात असेल, तर नोकरी गेल्यावर आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. नवीन कर्ज घेण्यापूर्वी स्वतःला विचारा की, पगार नसताना काही महिने तुम्ही हा हप्ता वेळेवर भरू शकाल का? पगार वाढला म्हणून लगेच अनावश्यक खर्च वाढवू नका.

तितकंच महत्त्वाचं आहे आरोग्य विमा. इन्शुरन्ससाठी पूर्णपणे कंपनीवर अवलंबून राहू नका. कारण नोकरी गेल्यावर ते कव्हरेजही संपतं, ज्यामुळे मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. त्यामुळे, स्वतःचा एक हेल्थ इन्शुरन्स आणि कुटुंबासाठी एक टर्म लाईफ इन्शुरन्स घेण्याचा नक्की विचार करा.

नोकरीतील अनिश्चिततेमुळे भविष्यासाठीची गुंतवणूक पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही. उत्पन्नात चढ-उतार होत असतील, तर दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणं बंधनकारक नाही. एक छोटी रक्कम नियमितपणे गुंतवा आणि ज्या महिन्यात जास्त उत्पन्न मिळेल, तेव्हा जास्त रक्कम गुंतवण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा नोकरी चांगली चालू असते, तेव्हा सगळं असंच चांगलं राहील असं समजून अनेकजण नवीन कार घेण्याचा किंवा मोठं कर्ज काढण्याचा विचार करतात. पण अशा चांगल्या काळात मिळणारा अतिरिक्त पैसा इमर्जन्सी फंडमध्ये टाकणं किंवा जास्त व्याज असलेली कर्जं फेडण्यासाठी वापरणं जास्त हुशारीचं ठरतं. आर्थिक स्थिरता म्हणजे फक्त एक स्थिर नोकरी असणं नव्हे, तर काही महिने उत्पन्न थांबलं तरी आर्थिकदृष्ट्या न खचता परिस्थितीला सामोरं जाणं, हे आहे.