नवीन कार घेताना इन्शुरन्स प्रीमियम, आयडीव्ही (IDV) आणि आवश्यक ॲड-ऑन्सबद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. डीलरने दिलेला पॅकेज घेण्यापेक्षा वेगवेगळ्या पॉलिसींची तुलना केल्यास तुमचे पैसे वाचू शकतात. तसेच, अपघात झाल्यास क्लेम कसा मिळवायचा, याची प्रक्रियाही वाहन मालकांना माहीत असली पाहिजे.
मुंबई : सणासुदीचा काळ सुरू झाला की नवीन कार खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. कार घेताना फायनान्सचे पर्याय निवडण्यासोबतच इन्शुरन्सची योग्य माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भारतात कार इन्शुरन्स हा केवळ कायदेशीर नियम नाही, तर वाहनाचं अचानक काही नुकसान झाल्यास तो मोठा आर्थिक आधार देतो.
वाहनाचं मॉडेल आणि प्रकारानुसार इन्शुरन्सचा प्रीमियम बदलतो. विशेषतः एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील डिझेल गाड्यांचा विचार केल्यास, एका वर्षाचं स्वतःच्या वाहनाचं कव्हर (Own Damage), तीन वर्षांचं थर्ड पार्टी कव्हर आणि इतर ॲड-ऑन्स मिळून इन्शुरन्सचा खर्च ४०,००० रुपयांच्या वर जाऊ शकतो. त्यामुळे नवीन कार घेताना इन्शुरन्सच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी प्रीमियमचं गणित नीट समजून घ्या.
नवीन कारच्या इन्शुरन्स प्रीमियममध्ये स्वतःच्या गाडीचं नुकसान, थर्ड पार्टी कव्हर आणि काही पर्यायी ॲड-ऑन्सचा समावेश असतो. इन्शुरन्स कंपनी वाहनाची जास्तीत जास्त व्हॅल्यू ठरवते, ज्याला आयडीव्ही (Insured Declared Value - IDV) म्हणतात. ही रक्कम कारच्या एक्स-शोरूम किमतीच्या ९५ टक्क्यांपर्यंत असू शकते. गाडी पूर्णपणे खराब झाल्यास किंवा चोरीला गेल्यास हीच जास्तीत जास्त रक्कम तुम्हाला मिळते.
इन्शुरन्स घेताना फक्त आवश्यक तेच ॲड-ऑन्स निवडायला हवेत. गाडीचे पार्ट्स बदलताना येणारा घसाऱ्याचा खर्च (Depreciation) टाळण्यासाठी 'झिरो डेप्रिसिएशन' कव्हर फायद्याचं ठरतं. गाडी चोरीला गेल्यास किंवा पूर्ण नुकसान झाल्यास खरेदीची मूळ किंमत परत मिळवण्यासाठी 'रिटर्न टू इन्व्हॉइस' उपयोगी पडतं. पाणी साचणाऱ्या भागात राहणाऱ्यांसाठी 'इंजिन प्रोटेक्शन' आणि जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी 'रोडसाईड असिस्टन्स' खूप महत्त्वाचे आहेत. पण टायर प्रोटेक्शन आणि की-रिप्लेसमेंट (Key Replacement) सारखे कव्हर खरोखर गरज असेल तरच घ्या. कार डीलरने दिलेला इन्शुरन्स पॅकेज डोळे झाकून घेण्यापेक्षा, वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना केल्यास तुमचे बरेच पैसे वाचू शकतात.
कमी प्रीमियम असलेल्या पॉलिसींमध्ये अनेकदा आयडीव्ही (IDV) कमी असतो किंवा क्लेम करताना तुम्हाला स्वतःच्या खिशातून जास्त पैसे मोजावे लागतात. तसेच, जर कधी अपघात झालाच, तर समोरच्या व्यक्तीशी वाद न घालता सुरक्षित ठिकाणी जा. एकमेकांच्या गाडीची, ड्रायव्हरची आणि इन्शुरन्सची माहिती शेअर करा. ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी (RC), एफआयआर (FIR), क्लेम फॉर्म आणि अपघाताच्या ठिकाणचे फोटो या सर्व गोष्टींसह पोलीस आणि इन्शुरन्स कंपनीला माहिती द्या. सर्व्हेअरने गाडीची पाहणी केल्यानंतरच रिपेअरिंगचं काम सुरू करा.

