तुम्ही पण भाजी किंवा डाळीला फोडणी देताना आधी गरम तेलात अख्खे मसाले टाकता का? ही एक सामान्य चूक तुमच्या जेवणाची सगळी चव घालवू शकते. शेफने सांगितलेली ही सोपी ट्रिक नक्की ट्राय करा.
स्वयंपाक करताना ही चूक करू नका
मुंबई: भारतीय स्वयंपाकघरात जेवण बनवताना बहुतेक वेळा सुरुवात कढईत तेल गरम करून त्यात मसाले टाकण्यापासूनच होते. जिरं, मोहरी, दालचिनी, लवंग किंवा वेलचीचा सुगंध संपूर्ण घरात दरवळतो. पण, तुम्ही हे मसाले फोडणीत कसे टाकता, यावर तुमच्या जेवणाची चव आणि पौष्टिकता अवलंबून असते, याचा कधी विचार केला आहे का? शेफ कुलदीप राणा यांनी नुकतंच स्वयंपाकातील एका सामान्य चुकीबद्दल सांगितलं आहे, जी आपल्यापैकी अनेकजण वर्षानुवर्षे करत आलो आहोत. चला तर मग, अख्खे मसाले वापरण्याची योग्य आणि शास्त्रीय पद्धत कोणती आहे, ते जाणून घेऊया.
मसाले थेट गरम तेलात का टाकू नयेत?
आपण सहसा तेल चांगलं गरम झालं की लगेच त्यात अख्खे मसाले टाकतो. पण तज्ज्ञांच्या मते, ही पद्धत फक्त काही विशिष्ट पदार्थांसाठीच योग्य आहे, जिथे मसाल्यांना 'स्मोकी' चव देण्यासाठी त्यांना थोडं जास्त भाजण्याची गरज असते. पण, जर तुम्हाला डाळ, भाजी किंवा सामान्य ग्रेव्हीमध्ये मसाल्यांची खरी चव आणि नैसर्गिक सुगंध हवा असेल, तर तुम्ही ही पद्धत वापरू नये. जास्त गरम तेलात मसाले थेट टाकल्यास ते काही क्षणांतच जळून जातात. असं जळल्यामुळे मसाल्यांमधील नैसर्गिक तेलं (natural oils) पूर्णपणे नष्ट होतात. याचा परिणाम असा होतो की, मसाले कडवट लागतात, जेवणाचा सुगंध नाहीसा होतो आणि तुमच्या मेहनतीवर पाणी फिरतं.
मग मसाले भाजण्याची योग्य आणि सोपी पद्धत कोणती?
तुमच्या हातचं जेवण सगळ्यांनी आवडीने खावं आणि त्याची चव वाढावी असं वाटत असेल, तर शेफने दिलेल्या या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा:
- मध्यम आच आणि योग्य तापमान: कडकडीत तापलेल्या किंवा धूर निघणाऱ्या तेलात कधीही मसाले टाकू नका. तापमान नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे.
- आधी कांदा आणि लसूण टाका: तेल गरम झाल्यावर आधी त्यात कांदा, लसूण किंवा आलं-लसूण पेस्ट घाला आणि सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांद्यामध्ये असलेल्या पाण्यामुळे तेलाचं तापमान संतुलित राहतं.
- योग्य वेळी मसाले घाला: कांदा थोडा परतला गेला आणि त्यातील ओलावा कमी झाल्यावर लवंग, वेलची, दालचिनी आणि जिरं यांसारखे अख्खे मसाले घाला.
- आच कमी असणं गरजेचं: कांद्यातील ओलावा आणि मसाल्यांच्या एकत्रितपणामुळे मसाले करपत नाहीत. या पद्धतीने स्वयंपाक केल्यास मसाल्यांचा सुगंध आणि चव तेल आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मुरते, ज्यामुळे जेवण तयार झाल्यावरही तो सुगंध टिकून राहतो.
एका छोट्या बदलाने मोठा फरक घडवा
स्वयंपाक हे फक्त एक काम नाही, तर ती एक सुंदर कला आहे. छोट्या-छोट्या बदलांमधून साध्या जेवणालाही एखाद्या फाईव्ह-स्टार हॉटेल किंवा रेस्टॉरंटइतकं चविष्ट आणि सुगंधी बनवता येतं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात 'फोडणी' तयार कराल, तेव्हा मसाले थेट गरम तेलात टाकू नका. योग्य वेळ आणि पद्धत वापरून चविष्ट जेवण सर्वांना वाढा.
