Car Market: आता गियर बदलायचं टेन्शन खल्लास! या आहेत बेस्ट ऑटोमॅटिक कार्स?
Car Market: तुम्ही नवीन कार चालवायला शिकत आहात का? शहरातल्या ट्रॅफिकमध्ये क्लच आणि गियर सांभाळताना दमछाक होतेय? तर मग तुमच्यासाठीच बजेटमध्ये बसणाऱ्या आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक कारची ही खास यादी.

टॉप 5 ऑटोमॅटिक कार
मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना अनुभवी ड्रायव्हर्सचीही दमछाक होते, तिथे नवीन शिकणाऱ्यांची काय अवस्था होत असेल! नवीन ड्रायव्हर्सना ट्रॅफिकमध्ये क्लच आणि गिअर एकाच वेळी सांभाळताना खूपच दडपण येतं. हीच अडचण दूर करण्यासाठी बाजारात 'ऑटोमॅटिक कार' आल्या आहेत. चला तर मग, नवीन ड्रायव्हर्ससाठी बजेटमध्ये बसणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या टॉप 5 ऑटोमॅटिक कार्स पाहूया.

मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10 AGS)
अल्टो ही भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबांची 'एव्हरग्रीन' निवड आहे. गाडीचा छोटा आकार अरुंद गल्ल्या आणि गर्दीच्या ट्रॅफिकमधूनही सहज वाट काढतो. यात AGS (ऑटो गिअर शिफ्ट) सुविधा आहे, ज्यामुळे पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. ही कार प्रति लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 24.90 किमी मायलेज देते. याची किंमत 5.50 लाख रुपयांपासून सुरू होते. सुरक्षेसाठी यात ड्युअल एअरबॅग्ज आणि ABS with EBD सारखे फीचर्स आहेत.
मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio AGS)
मारुती सुझुकी सेलेरियो ही जास्त मायलेज आणि कमी बजेट या दोन्ही गोष्टींची पूर्तता करते. ज्यांना अल्टोपेक्षा थोडी जास्त प्रशस्त गाडी हवी आहे, त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. यातील 'हिल होल्ड असिस्ट' फीचरमुळे चढावावर गाडी थांबवून पुन्हा पुढे नेताना ती मागे घसरत नाही. नवीन ड्रायव्हर्ससाठी हे एक वरदानच आहे. ही कार प्रति लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 26.68 किमी मायलेज देते आणि भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या पेट्रोल ऑटोमॅटिक कारपैकी एक आहे. या गाडीची किंमत 6.50 लाख रुपयांपासून सुरू होते.
रेनॉ क्विड (Renault Kwid AMT)
ज्यांना कमी किमतीत मिनी एसयूव्हीसारखा दमदार लूक हवा आहे, त्यांची पहिली पसंती रेनॉ क्विड असते. यात गिअर बदलण्यासाठी लिव्हरऐवजी डॅशबोर्डवर एक 'रोटरी डायल' आहे, जे नवीन ड्रायव्हर्ससाठी खूप सोपे आहे. ही कार सुमारे 22.30 किमी मायलेज देते. यात Easy-R AMT ट्रान्समिशन आहे. 184 मिमी ग्राउंड क्लिअरन्समुळे खराब रस्त्यांवर किंवा स्पीड ब्रेकर्सवर गाडी घासण्याची भीती नाही. रिव्हर्स पार्किंग कॅमेऱ्यामुळे गाडी मागे घेणं सोपं होतं. या गाडीची किंमत 5.44 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R AGS)
भारताची 'टॉल बॉय' म्हणून ओळखली जाणारी वॅगन आर कुटुंबासोबतच्या प्रवासासाठी उत्तम आहे. तिच्या उंच डिझाइनमुळे गाडीत चढणं-उतरणं खूप सोपं होतं. उंच सीटिंग पोझिशनमुळे ड्रायव्हरला रस्त्याचा आणि पुढच्या वाहनांचा स्पष्ट अंदाज येतो. नवीन ड्रायव्हर्सना गाडीच्या चारही कोपऱ्यांचा अंदाज घेऊन गाडी चालवणं सोपं जातं. ही कार प्रति लिटर पेट्रोलमध्ये 25.19 किमी मायलेज देते. या गाडीची किंमत 6.55 लाख रुपयांपासून सुरू होते.
टाटा टियागो (Tata Tiago AMT)
ज्यांना मायलेज आणि किमतीसोबतच सुरक्षेलाही महत्त्व द्यायचं आहे, त्यांच्यासाठी टाटा टियागो हा पहिला पर्याय आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार रेटिंग मिळालेली ही कार भारतीय रस्त्यांसाठी खूप मजबूत आहे. यात 5 स्पीड AMT ट्रान्समिशन आहे. ही कार प्रति लिटर पेट्रोलमध्ये 20 किमी मायलेज देते. यातील 'कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल' सिस्टीममुळे वळणांवर गाडी नियंत्रणाबाहेर न जाता स्थिर राहते. या गाडीची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.

