जर्मन कार कंपनी BMW ने आपल्या 2027 7 सिरीज फेसलिफ्ट मॉडेलचा टीझर रिलीज केला आहे. नवीन डिझाइन, चमकणारी किडनी ग्रिल आणि पॅनोरॅमिक आयड्राइव्ह सिस्टीम यांसारख्या बदलांसह ही कार 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. सध्याचे इंजिन पर्याय कायम राहतील असा अंदाज आहे.

र्मन लक्झरी कार कंपनी BMW ने आपली प्रसिद्ध लक्झरी सेडान, BMW 7 सिरीजच्या 2027 फेसलिफ्ट मॉडेलचा टीझर फोटो ऑफिशिअली रिलीज केला आहे. 2023 पासून बाजारात असलेल्या सातव्या जनरेशनच्या (G70) मॉडेलला हे एक 'मिड-सायकल अपडेट' असणार आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या टीझर फोटोमध्ये गाडीचा पूर्ण लूक दिसत नसला तरी, काही महत्त्वाचे डिझाइन बदल नक्कीच दिसून येत आहेत.

टीझर फोटोमध्ये गाडीचे LED डेटाइम रनिंग लाइट्स आणि चमकणारी किडनी ग्रिल प्रामुख्याने दिसते. यावरून असं दिसतंय की, BMW च्या नवीन डिझाइननुसार गाडीच्या फ्रंट लूकमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. सध्याच्या मॉडेलमधील स्प्लिट लायटिंग डिझाइन कायम राहील, पण ते अधिक आकर्षक आणि स्लीक बनवलं जाईल, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. गाडीची मोठी किडनी ग्रिल आणि त्यातील 'आयकॉनिक ग्लो' लायटिंग फीचर या फेसलिफ्ट मॉडेलमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. गाडीच्या साईड प्रोफाइलमध्ये फार मोठे बदल अपेक्षित नाहीत. कमीत कमी लाईन्स असलेलं बॉडी डिझाइन कायम राहील. BMW गाड्यांची ओळख असलेला 'किंक' डिझाइन एलिमेंटही तसाच ठेवला जाईल. गाडीच्या मागच्या टेललाइट्समध्ये आणि पुढच्या-मागच्या बंपरमध्ये काही छोटे बदल केले जाऊ शकतात.

गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन मॉडेल अधिक आधुनिक टेक्नॉलॉजीसह येईल. BMW ची नवीन 'पॅनोरॅमिक आयड्राइव्ह सिस्टीम' या गाडीत दिली जाण्याची शक्यता आहे. डॅशबोर्डच्या संपूर्ण रुंदीवर पसरलेला एक मोठा पॅनोरॅमिक डिस्प्ले हे याचं वैशिष्ट्य आहे. याशिवाय, ड्रायव्हरच्या नजरेसमोर विंडशील्डवरच गाडीची माहिती दाखवणारा 3D हेड्स-अप डिस्प्लेचा ऑप्शनही मिळू शकतो. नवीन सेंटर कन्सोल लेआउट, अधिक आरामदायी सीट्स आणि मागच्या प्रवाशांसाठी सुधारित सुविधा यांसारखे बदलही नवीन मॉडेलमध्ये असतील, असं म्हटलं जातंय. या बदलांमुळे गाडीला तिची मुख्य स्पर्धक मर्सिडीज-बेंझ एस-क्लासशी स्पर्धा करण्यास मदत होईल.

इंजिनच्या पर्यायांमध्ये फार मोठे बदल अपेक्षित नाहीत. सध्याचे 3.0-लिटर इनलाइन-सिक्स माइल्ड-हायब्रीड आणि प्लग-इन हायब्रीड इंजिन पर्याय कायम राहतील, असा अंदाज आहे. हे इंजिन 483 bhp पर्यंत पॉवर निर्माण करतात. याशिवाय, 4.4-लिटर V8 इंजिन सुमारे 536 bhp पॉवरसह उपलब्ध होऊ शकतं. जास्त परफॉर्मन्स देणारं M-spec व्हर्जनही परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2027 BMW 7 सिरीज फेसलिफ्ट मॉडेल एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या बीजिंग ऑटो शोमध्ये अधिकृतपणे सादर केली जाईल, अशी अपेक्षा आहे. त्याआधी गाडीचं ऑनलाइन लाँचिंग होण्याचीही शक्यता आहे.