मायक्रोसॉफ्टच्या आउटलुक, टीम्स, कोपायलट आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अमेरिका आणि भारतातील युजर्सना मोठा फटका बसला आहे.
मुंबई: गुरुवारी आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मायक्रोसॉफ्टच्या आउटलुक, टीम्स, कोपायलट आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ या प्लॅटफॉर्म्सवर मोठा बिघाड झाला. यामुळे अमेरिका आणि भारतातील मायक्रोसॉफ्ट आउटलुक युजर्सना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अनेक युजर्सनी त्यांचे ईमेल अकाउंट्स उघडताना अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे.
काही युजर्सना नेटवर्कमध्ये अडथळे येत होते, तर काहींना ईमेल पाठवण्यात आणि रिसिव्ह करण्यात अडचणी येत होत्या. मायक्रोसॉफ्टचं ऑफिस चॅट ॲप टीम्स आणि त्यांचा AI असिस्टंट कोपायलटलाही या बिघाडाचा फटका बसला.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गुरुवारी दुपारी सुमारे १:२७ वाजता (ET), डाऊनडिटेक्टर या आऊटेज ट्रॅकिंग वेबसाइटवर आउटलुकमधील बिघाडाच्या १,३०,००० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. डाऊनडिटेक्टर अनेक ठिकाणांहून डेटा गोळा करत असल्याने प्रभावित युजर्सचा खरा आकडा याहून वेगळा असू शकतो.
याशिवाय, मायक्रोसॉफ्ट ३६५ मध्ये बिघाड झाल्याच्या सुमारे ४६,००० तक्रारी आणि टीम्स सुरू न होण्याच्या सुमारे ३,००० तक्रारी या ट्रॅकरवर नोंदवल्या गेल्या.
मायक्रोसॉफ्ट आऊटेजवर नेटिझन्सची भन्नाट रिॲक्शन
या बिघाडामुळे घाबरून जाण्याऐवजी, इंटरनेटवर लोकांनी भन्नाट रिॲक्शन दिल्या आहेत. मिटिंग्ज, ईमेल्स आणि डेडलाईन्सपासून अचानक मिळालेल्या या सुट्टीमुळे युजर्सनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला आहे.
मायक्रोसॉफ्टने काय प्रतिक्रिया दिली?
या बिघाडाची चौकशी करत असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टने केला आहे. कंपनीने सांगितलं की, सोशल मीडिया पोस्ट्सनुसार 'अमेरिकेतील युजर्सना अनेक कनेक्शन पद्धतींद्वारे एक्सचेंज ऑनलाइन मेलबॉक्स ॲक्सेस करताना अडचणी येत असल्याचं' त्यांना माहिती आहे. नंतरच्या एका अपडेटनुसार, मायक्रोसॉफ्टच्या पायाभूत सुविधांच्या एका भागावर 'लोड वाढल्याने' हे कनेक्टिव्हिटी एरर्स येत असल्याची शक्यता आहे.
कनेक्शनच्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोड बॅलन्स करण्यासाठी ट्रॅफिक 'रिडिस्ट्रिब्युट' करण्यास सुरुवात करणार असल्याचंही कंपनीने सांगितलं.तसंच, या आऊटेजमुळे इतर भागातील ग्राहकांना मायक्रोसॉफ्ट ३६५ च्या सेवा वापरता येणार नाहीत, असंही मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केलं.
उत्तर अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट टीम्सच्या युजर्सना येणारा अडथळा 'यशस्वीरित्या सोडवला' असल्याचं कंपनीने दिवसाच्या सुरुवातीला सांगितलं होतं. तरीही, या घोषणेनंतरही काही ग्राहकांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत होत्या.














