Cyber Attack भारतातील मोठी ऑटो कंपनी बजाज ऑटोवर रॅन्समवेअर हल्ला झाला आहे. कंपनीने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला, तरी ग्राहकांचा डेटा किंवा कंपनीची महत्त्वाची माहिती चोरीला गेली आहे का, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी, बजाज ऑटोवर (Bajaj Auto) सायबर हल्ला झाला आहे. कंपनीने स्वतःच ही माहिती दिली असून, हा एक 'रॅन्समवेअर' हल्ला (Ransomware Attack) असल्याचं सांगितलं आहे. या हल्ल्याचा परिणाम कंपनीच्या सिस्टीमवर आणि तिची उपकंपनी असलेल्या 'बजाज ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड' (BATL) च्या काही सिस्टीमवरही झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा सायबर हल्ला २३ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला. ही घटना लक्षात येताच, कंपनीची टेक्निकल टीम, सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि व्यवस्थापनाने तातडीने पावलं उचलली. हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी अनेक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या.

नक्की काय परिणाम झाला?

बजाज ऑटोने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे की, प्राथमिक तपासानुसार उचललेली पावलं यशस्वी ठरली आहेत आणि हल्ल्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणला आहे. पण, या हल्ल्यामुळे कोणत्या सेवांवर परिणाम झाला, ग्राहकांचा किंवा कंपनीचा कोणताही डेटा चोरीला गेला आहे का, किंवा उत्पादन आणि व्यवसायावर काही परिणाम झाला आहे का, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

रॅन्समवेअर हल्ला म्हणजे काय?

रॅन्समवेअर हल्ला म्हणजे एक प्रकारचा सायबर हल्ला, ज्यात हॅकर्स एखाद्या कंपनीच्या किंवा व्यक्तीच्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये घुसून महत्त्वाचा डेटा लॉक करतात. हा डेटा परत मिळवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते, ज्याला 'रॅन्सम' किंवा सोप्या भाषेत खंडणी म्हणतात. अलिकडच्या काळात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या अशा हल्ल्यांना बळी पडल्या आहेत.